प्रतापगड पर्यटकांसाठी शुक्रवारपासून खुला करण्यात आला. अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या आठवडय़ापासून सुरू होती. याकाळात जमावबंदी लागू करत प्रतापगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिकांच्या मागणीनुसार प्रतापगडावरील पर्यटन सर्वासाठी खुले करण्यात आले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरी वरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मागील आठवडय़ात सुरू करण्यात आली. यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. पर्यटकच नाहीतर या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही गडावर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली होती. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिकांपासून ते र्पयटकांपर्यंत अनेकांची गैरसोय होत होती. पर्यटकांसोबतच गडावरील व्यावसायिकांनीही ही बंदी उठवण्याची मागणी केली होती. अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम काल पूर्ण झाल्यानंतर आजपासून गडावरील बंदी आदेश मागे घेण्यात आला. यामुळे आजपासून गडावर पर्यटकांना प्रवेश देण्यात येऊ लागला. सातारा जिल्हा प्रशासनाच्या किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याच्या निर्णयाचे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.