काहीही करा आणि ऑक्सिजनचा
प्रश्न सोडवा : न्यायालय
राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या मुद्द्यावरुन गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. दिल्ली सरकारने या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. केंद्र सरकार ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे, असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला, ‘रोज लोक मरतायत, तुम्ही काहीही करा आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात पावलं उचला,’ असं सांगितलं आहे.
विनामूल्य रोगप्रतिबंधक लस
मोफत टोचणे आवश्यक : राहुल गांधी
देशभरात अनेक ठिकाणी सध्या लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे लसीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांना मोफत लस दिली गेली पाहिजे. असं पुन्हा एकदा म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.
राहुल गांधी यांनी अँडजेक्टिव्ह आणि अँडवर्बचं उदाहरण देत कोरोना लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. “भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल.” असं राहुल गांधी यांनी ट्विट करत, सोबत #vaccine असं देखील जोडलं आहे.
महाराष्ट्राची वाटचाल
तिसऱ्या लाटेच्या दिशेने
महाराष्ट्राला लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या लस नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात नऊ कोटी लसींपैकी फक्त दिड कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, ती खूपच कमी आहे. जर आपण लसीकरण ती वाढविले नाही, तर जेव्हा लोक नोकरी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडतात, तेव्हा कोविड १९ ची तिसरी लाट येऊ शकते. डिसेंबरमधील कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे लोक बेफिकीर झाले आणि कोविड १९ ची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू
दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा
कोरोना लसीकरण केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने पंजाबमधील एका व्यक्तीने लस घेण्यास नकार दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने या प्रमाणपत्रावर लावण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय. यासंदर्भात या व्यक्तीने राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्रही लिहिलं आहे. पंजाबमधील एका प्राध्यापकाने लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा नाहीतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केलीय.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस
साधेपणाने साजरा करा
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत आज निर्गमित करण्यात आल्या आहेत. व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत.
अमेरिकन नागरिकांना
भारत सोडण्याचे आदेश
भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे.
विहिरीत पडून दोन अस्वली,
दोन पिल्लांचा बुडून मृत्यू
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोनअंतर्गत एका कठडे नसलेल्या विहिरीत पडून दोन अस्वली व दोन पिल्लांचा बुडून करून अंत झाला. सदर घटना उघडकीस आली आहे. उन्हाळ्याच्या भीषण तापमानात वन्यजीव मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात येत असतो, मात्र कधीकधी ही तहान त्यांच्या जिवावर बेतते.
या वर्षीची चारधाम
यात्रा आता रद्द
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली आहे. चार मंदिरांमध्ये फक्त त्या त्या मंदिराचे पुजारी पुजा आणि इतर धार्मिक विधी करतील, इतर कोणालाही या मंदिरांमध्ये प्रवेश असणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
बंगळुरु शहरातील २ ते ३ हजार
कोरोना बाधित अचानक गायब
बंगळुरु शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. तो कसा आटोक्यात आणावा यासाठी राज्य सरकार खटपट करीत आहे. मात्र, त्यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील २ ते ३ हजार कोरोना बाधित हे अचानक गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाधितांचे मोबाईल फोन हे स्विच ऑफ (बंद) आढळून येत आहेत. तसेच, त्यांचे घरही रिकामे असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारची धडधड वाढली आहे. हे सर्व जण कुठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांना या रुग्णांच्या शोधार्थ जबाबदारी देण्यात आली आहे.
देशमुख प्रकरणात सीबीआय
शुक्ला यांना साक्षीदार करणार
अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला.
कोरोना महामारी राष्ट्रीय
आपत्ती जाहीर करावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
सुनील मानेच्या मोबाईलमध्ये
अँटेलिया परिसरापर्यंतचा नकाशा
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) केला आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती.
भाजप नेत्या पंकजा मुंडे
यांना कोरोनाची लागण
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मॅच फिक्सिंग प्रकरणी
झोयसावर ६ वर्षांसाठी बंदी
श्रीलंकेचा माजी जलदगती गोलंदाज आणि प्रशिक्षक नुवान झोयसावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि संशयित भारतीय सट्टेबाजांच्या भ्रष्टाचाराचे खुलासे न केल्याप्रकरणी झोयसावर ही कारवाई करण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590