विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66 वा गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोळी पूजन करून गव्हाण पूजन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी मेळाव्याला अजित पवारांनी हजेरी लावली. शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं. या कार्यक्रमात अजित पवार यांची फजिती झाली.
भाषण करत असताना अजित पवारांचा फेटा सुटला. फेटेवाला परत फेटा बांधायला गेला, तेव्हा अजित पवार म्हणाले तुरा पडला का आमचा? त्याने बांधल्यावर म्हणाले आता नाही पडणार? तू कुणाची तरी सुपारी घेऊन आलेला दिसतोय, असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.
अजित पवारांचं भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर फेटा पुन्हा सुटला, तेव्हा आता काढूनच ठेवतो, असं अजित पवार म्हणाले. जस जसे माझं वय वाढते आहे तस तस मी काम जास्त करतो आहे. सकाळी लवकर उठतो आणि रात्री उशिरा झोपतो. मी तुमचं कधीही वाईट होईल असं करणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलं.
फडणवीसांचं ऐकलं
देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले होते, भीमा पाट्स कारखान्यात राहुलला मदत करा. आम्ही राजकीय विरोधी असलो तरी आम्ही एकमेकांना मदत करत असतो. हर्षवर्धन पाटील यांना देखील सांगितले होते जिल्हा बँकेकडून कर्ज घ्या तुम्हाला फायद्याचे आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
कोटा पद्धत आली तर आपल्याला फटका बसेल. काही कारण नसताना उत्तर प्रदेशला पैसे द्यावे लागतील. मी फडणवीस यांना सांगितले आहे की फक्त पत्र पाठवून चालणार नाही. दिल्लीत जाऊन अमित शहा यांना भेटा.. मी देखील उद्या साखरे बाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.