केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह आणि नाव घ्यावं लागणार आहे. ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. तर, शिंदे गटाचीही रविवारी रात्री बैठक झाली असून यात निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे. अशात आता दोन्ही गटांना कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याचा फैसला निवडणूक आयोग आज करणार आहे.
सोमवारी (आज) दुपारी एक वाजेपर्यंत याबाबत पर्याय देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना केली होती. ठाकरे गटाने पर्यायी नावे आणि चिन्हे सादर केली आहेत. मात्र, शिंदे गटाने अद्याप ती सादर केलेली नाहीत. लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याचं शिंदे गटाच्या बैठकीनंतर सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे, निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिंदे गट पर्यायी चिन्हे आणि नावे सादर करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा हा निकाल अंधेरी पोटनिवडणुकीकरीता असल्याने त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवडणूक आयोगाला कोणती तीन नावं आणि तीन चिन्हं सादर करायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सोमवारी म्हणजेच आज शिंदे गट याबाबत पत्रक काढून आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.