आयआयटी’सारख्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा, ‘आयआयटीयन्स’मध्ये आपलंही नाव गौरवानं घेतलं जावं, म्हणून देशभरातील अनेक विद्यार्थी धडपड करत असतात. कारण आयआयटीत शिक्षण घेतल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची श्वाश्वती असते; पण आयआयटीमध्ये शिक्षण घेताना गोल्ड मेडल मिळवणारा एक इंजिनीअर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून संन्यासी झाला आहे. या व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयआयटी दिल्लीतून बी.टेक केलेल्या गोल्ड मेडलिस्ट इंजिनीअर संन्यासी बनला आहे. संदीप कुमार भट्ट असं त्यांचं नाव असून, सध्या ते स्वामी सुंदर गोपाल दास नावाने प्रसिद्ध आहेत.
मूळचे बिहार येथील असणाऱ्या भट्ट यांनी 2002 आयआयटी दिल्लीतून बी.टेक केलं, व त्या परीक्षेमध्ये गोल्ड मेल्डलसुद्धा मिळवलं. नंतर 2004 मध्ये एम.टेक पूर्ण केलं. 2004 ते 2007 पर्यंत लार्सन अँड टुब्रो येथे मॅनेजर म्हणून नोकरी केली; पण 2007 मध्येच म्हणजेच वयाच्या 28 व्या वर्षी ते नोकरीचा राजीनामा देऊन अध्यात्माचा मार्ग स्वीकारत संन्यासी झाले. ते ब्रह्मचारी आहेत.
संदीप भट्ट म्हणतात…
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून संन्यासी झालेले संदीप कुमार भट्ट उर्फ गोपालदास म्हणतात, ‘लोक भौतिक सुखांच्या मागे लागले आहेत. यंत्राचा दर्जा वाढत आहे, पण माणसाची गुणवत्ता कमी होत आहे.
दरवर्षी लाखो गुन्हे घडतात, हा माणसाची गुणवत्ता ढासळत असल्याचा पुरावा आहे. माझ्या मते सुशिक्षितांनी साधू-संत झालं पाहिजे. शेवटी, मोठ्या कंपन्यांनी आयआयटीमधून लोकांना नोकरी देण्याचं कारण काय आहे? समाजात चांगल्या गोष्टींना चालना द्यायची असेल, तर अशा लोकांनीही पुढे आलं पाहिजे.’
आत्महत्या, ड्रग्ज या विषयावरही भट्ट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘सर्व चुकीच्या सवयी सुधारण्यासाठी धार्मिक शिक्षणाची गरज आहे. लोकांना माणूस कसं व्हायचं, हेच कळत नाही. लोकांमध्ये स्वयंनियमन नाही. नोबेल मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारलं तर ते खरंच मोठं काम आहे.’
गीतेमुळे आयुष्यात मोठा बदल
आयआयटी दिल्लीत असताना संदीप भट्ट यांनी श्रीमद भगवद्गीता वाचली, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. संन्यासी होण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय त्यांना त्यांच्या कुटुंबियांना समजावून सांगण्याचे आव्हान होते. ते म्हणाले, ‘जेव्हा माझ्या कुटुंबियांना मी संन्यासी झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया इतर कोणत्याही कुटुंबातील सदस्यांसारखीच होती. पण, मला हेच करायचं आहे, असं मी त्यांना समजवून सांगितलं.’
म्हणून झाले संन्यासी
इंजिनीअरिंग करत असताना संदीप भट्ट उर्फ गोपालदास यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या आजूबाजूला अनेक इंजिनीअर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते आहेत. पण, समाजाला वेगळा मार्ग दाखवू शकेल, असा माणूस नाही. लोकांचं चारित्र्य सुधारण्यासाठी. धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते संन्यासी झाले.
संदीप भट्ट यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.