बांगलादेशात हिंदू भाविकांना दुर्गापूजेसाठी घेऊन जाणारी बोट रविवारी उलटून झालेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. बोटीतून ७० ते ८० जण प्रवास करत होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
पंचगड जिल्ह्यातील बोदेश्वरी मंदिराकडे निघालेल्या भाविकांची बोट कोरोटा नदीमध्ये बुडाली. आतापर्यंत १२ महिला आणि ८ मुलांसह २४ मृतदेह सापडले असून, अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन विभागातर्फे बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याचे पंचगड जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुलेमान अली यांनी सांगितले. ही यांत्रिक बोट असून अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते का, याचीही तपासणी केली जात आहे. बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसिना यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. बांगलादेशातील हजारो हिंदू भाविक अत्यंत पुरातन असलेल्या बोदेश्वरी मंदिरात दुर्गापूजेनिमित्त जात असतात. या दुर्घटनेमुळे उत्सवाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.