पलायनानंतर गोटाबाय राजपक्षे मायदेशी परतले, कोलंबो विमानतळावर पक्षातील नेत्यांकडून स्वागत

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे शुक्रवारी सात आठवड्यांनंतर मायदेशी परतले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकन जनतेने थेट राष्ट्रपती भवनात उग्र आंदोलन केल्यानंतर गोटाबाय यांनी कुटुंबासह थायलंडला पलायन केले होते. कोलंबो विमानतळावर दाखल होताच पक्षातील नेत्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. देशातील खराब आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे.

गोटाबाय राजपक्षे यांनी १३ जुलैला पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह पलायन केले होते. श्रीलंकन हवाई दलाच्या विमानातून त्यांनी देश सोडला होता. देश सोडण्याआधीपासूनच राजपक्षे यांच्या राजीनाम्याची जनतेकडून मागणी होत होती. थायलंडला जाण्याआधी राजपक्षे यांनी सिंगापूरला आश्रय घेतला होता. सिंगापुरात आपले राजकीय उत्तराधिकारी रनिल विक्रमसिंघे यांची भेट घेत त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडींनंतर ७३ वर्षीय राजपक्षे बँकॉकमधून सिंगापूर हवाई मार्गे एका व्यावसायिक विमानातून मायदेशी परतले आहेत.

देश सोडल्यापासून ५२ दिवस थायलँडमधील एका हॉटेलमध्ये राजपक्षे राहत होते. अनेक दिवसांपासून मायदेशी परतण्यासाठी ते आग्रही होते. रनिल विक्रमसिंघे यांनी एकेकाळच्या राजकीय दृष्ट्या शक्तीशाली असलेल्या राजपक्षे कुटुंबीयांना संरक्षण दिल्याचा आरोप श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजपक्षे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. श्रीलंकेतील प्रसिद्ध वृत्त संपादक लसंथा विक्रममाटुंगे यांच्या हत्येच्या कथित आरोपानंतर राजपक्षे यांना या प्रकरणी अटक व्हावी, यासाठी पत्रकारांचा दबाव वाढला आहे.  “राजपक्षे यांच्या मायदेशी परतण्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना लवकरच शिक्षा होईल”, असे ‘श्रीलंका यंग जर्नलिस्ट असोसिएशन’चे प्रवक्ते थारिंदू जयावर्धाना यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.