महिला सक्षमीकरणाचा नवा मार्ग; २० कचरा वेचक महिलांना ई-वाहनांची मालकी

कचरा वाहतुकीत महिलांचा सहभाग

लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी वाहनांची मालकी मिळवून दिली आहे. ही सक्षमीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि डिक्की या औद्योगिक संघटनेचे संस्थापाक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी पुढाकार घेतला. कचऱ्यातून उदरनिर्वाह चालविणाऱ्या शंभर महिलांना तीन चाकी वाहनांसाठी कर्ज व राज्य सरकार तसेच डिक्की संघटनेकडून प्रत्येकी २५ टक्के अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. महापालिकेने त्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे वाहने घेऊन देण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.

कचरा वेचक महिलांना प्रारंभीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शहरात पूर्वी कचरा वेचक महिला या गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करण्याचे काम करत व ते विकूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत जेव्हा घंटागाडी सोबत कचरा वेचण्याचे काम सुरू झाले तेव्हा महिलांना रोजगार मिळाला. तो रोजगार उदरनिर्वाह करण्यास पुरेसा नसे. त्यामुळे या महिलांना सक्षम करण्याची योजना आखण्यात आली.

साधारणपणे महिला कोणतेही काम आवडीने करतात. दिलेली जबाबदारी पार पाडतात. शहरात भाडय़ाने वाहने घेऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू होते, त्या ऐवजी या महिलांनाच वाहनांचे मालक बनविण्याचे जनाधार संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले. पाचशे कुटुंबाचा कचरा गोळा करण्यासाठी एक वाहन या पद्धतीने नियोजन केले तर कचरा गोळा होईल आणि महिलांना प्रतिष्ठा मिळेल अशी कल्पना समोर आली. वाहन खरेदीसाठी एसबीआय बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली. पहिला टप्प्यात २० महिलांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले. एका वाहनाची किंमत तीन लाख ४८ हजार रुपये असून त्यातील ५० टक्के अनुदान मिळणार आहे. अनुदानाशिवाय उर्वरित रकमेला परतफेडीसाठी मुदत पाच वर्ष देण्यात आली आहे.

देशातील पहिली मनपा

जनाधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या क्षेत्रात काम करतो आहोत. महिलांच्या मार्फत काम केले तर ते चांगले होते हा आपला अनुभव आहे. त्यामुळेच कचरा वेचक महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनाच वाहन घेऊन द्यावे त्यासाठी आवश्यक ती मदत करावी यासाठी आपण प्रयत्न केले. वीस वाहने एसबीआय बँकेने कर्जावर दिली आता अनेक बँका पुढे येत आहेत. १०० वाहने खरेदी केली जाणार आहेत त्याला मंजुरी मिळाली आहे. ६५ महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे व उर्वरित ३५ महिलांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जनाधारचे संजय कांबळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.