स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजवलेल्या एसटी बसचे स्वागत करताना त्या चालवायला घेत शहरातून फेरफटका मारण्याची धक्कादायक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी येथे केली आहे. बसमधील प्रवासी आणि शहरातील रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कृत्याची चित्रफीत समाजमाध्यमावरून प्रसारित होताच त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असाच प्रकार कवठेमहांकाळ येथे घडला असून येथील आगारात दाखल झालेली नवी एसटी बस चालवण्याचा मोह माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आवरता आला नाही.
दरम्यान, या गंभीर प्रकाराविरुद्ध भाजपने पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करत कारवाईचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे एसटीचे विभागीय नियंत्रकांनीदेखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मुहूर्तावर अनेक आगारांमध्ये नवीन बस दाखल झाल्या. या अंतर्गतच इस्लामपूर आगारातील सजवलेल्या एसटी बसचे स्वागत आणि पूजेसाठी पाटील आले. या वेळी बसगाडय़ांची पूजा करताना त्यांनी ही बस प्रवाशांसह थेट चालवण्यास घेतली. एसटी स्थानकात चक्कर मारल्यावर ही बस घेऊन हे माजी मंत्री इस्लामपूर शहरातून दोन किलोमीटरची फेरी मारून आले. हा सर्व प्रकार शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सुरू होता. प्रवासी बस चालवण्यासाठी विशेष परवाना आणि प्रशिक्षणाची गरज असते. या पार्श्वभूमीवर असा परवाना नसताना पाटील यांनी ही एसटी बस शहराच्या वर्दळीच्या भागातून चालवली. या गंभीर प्रकाराविरुद्ध भाजपने पोलिसांकडे तक्रार दाखल करत पोलीस निरीक्षकांच्या दालनातच ठिय्या मारला. शहरातील अन्य संस्थांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी सुरू केली आहे. एसटीचे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांनीदेखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारातील एसटी बस शहरात चालवण्याचा प्रकार हा गंभीर आहे. हे कृत्य बेकायदेशीर आहे. ती त्यांनी कशी चालवली, त्यांनी अशी मागणी केली का, ती चालवण्याची परवानगी त्यांना कोणी दिली अशी सर्व प्रकारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल.