शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्येही मोठं बंड होणार? गिरीश महाजनांच्या दाव्यानंतर राजकीय खळबळ

शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र, बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार अनुपस्थित होते. यात अशोक चव्हाणांसह काही मोठ्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशात आता गिरीश महाजन  यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने आलं होतं. माझ्या संपर्कातील लोकांना असं वाटतं की तिकडे राहून काही उपायोग नाही.

पुढे ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सेनेची नैसर्गिक युती नव्हती. सेना-भाजप एकत्र लढलो होतो. जनतेनं आम्हाला निवडून दिलं होतं. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व विकासाच्या दृष्टीने नंबर एकवर आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की भाजपशिवाय आता पर्याय नाही.माझ्या संपर्कात काँग्रेस , राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आहेत. काँग्रेसमध्ये तर मोठं आलबेल सुरू आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वही कोणाला विचारत नाही? खाली काय सुरू आहे याकडे त्यांचं लक्ष नसतं. काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे कोणाला विचारतात? कोणाला वेळ देतात? त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्व अलबेल सुरू आहे. अनेकांना वाटतं की आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, जिथे आपल्याला राजकीय न्याय मिळेल , असा दावा महाजनांनी केला आहे. यानंतर आता शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.