आज दि.५ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

कुणाच्या नावाच्या टॅटू आहे, मैत्रिणीचा का? अजितदादांनी साधला अचूक ‘निशाणा’

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. आज पुणे विद्यापीठात अजित पवार आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. यावेळी अजितदादांनी रायफल शूटिंगचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, अजितदादांनी अचूक निशाणा साधला. यावेळी जिमची पाहणी करत असताना तरुणाच्या हातावरच टॅटू पाहिला आणि हा टॅटू मैत्रिणीच्या नावाचा आहे का?  अजितदादांनी असं विचारताच एकच हश्शा पिकली.

विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड

आयफा सोहळ्याकडे गेले बरेच दिवस अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. नामांकनाची यादी जाहीर झाल्यापासूनच कोणाला अवॉर्ड मिळेल याची उत्सुकता लागली होती. 

सध्या सगळीकडे IIFA 2022 पुरस्कार सोहळ्याची चर्चा होत आहे. यात कोण परफॉर्म करणार आणि कोणाला अवॉर्ड मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून जुबिन नौटियालने आयफा अवॉर्ड घरी नेण्याचा मान मिळवला. रातां लंबिया गाण्यासाठी त्याला हे पारितोषिक मिळालं.

असीस कौर या गायिकेला रातां लंबिया गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी विभागून पुरस्कार देण्यात आला. ए आर रहमान यांच्यासह तनिश बागची, जसलीन रॉय, जावेद मोहसीन, विक्रम मोन्ट्रॉस, बी प्राक, जानी यांना पुरस्कार मिळाला.

कौसर मुनीर याना 83 चित्रपटातील ‘लहरा दो’ गाण्यासाठी गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला.

विजय गांगुली यांना चकाचक गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट डान्स कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला.

सुनील शेट्टी यांचा मुलगा आहान शेट्टी याला आयफा अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू मेलचा पुरस्कार वडीलांच्या हस्ते मिळाला.

शर्वरी वाघ या अभिनेत्रीला बंटी बबली 2 चित्रपटासाठी बेस्ट फिमेल डेब्यू असा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट कथेसाठी अनुराग बासू यांना ल्युडो चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.

अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

तर अभिनेत्री सई ताम्हणकरने सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा पार दुबईमध्ये फडकवला.

विकी कौशलने सर्वोकृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर स्वतःच नाव कोरलं. त्याच्या सरदार उद्धम चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हे पारितोषिक त्याला मिळालं.

बॉलिवूडच्या परम सुंदरीला अर्थात अभिनेत्री क्रिती सॅनोनला मिमी चित्रपटातील अप्रतिम कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा आयफा पुरस्कार विष्णूवर्धन यांना शेरशाह चित्रपटासाठी मिळाला.

आयफा 2022 सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराचा शेरशाह चित्रपट मानकरी ठरला.

मुंबईत कोरोनाचा वणवा पुन्हा पेटला, दिवसभरात तब्बल 961 बाधित

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना पुन्हा थैमान घालू लागला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट आली की काय? अशी भीती वर्तवली जात आहे. राज्य आणि देशातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोरोनाने पुन्हा डोकंवर केल्याने सर्वसामान्यांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण सध्याची परिस्थितीत तेच सांगताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 961 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा हाच आकडा काल 889 इतका होता. गेल्या आठ दिवसात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत रोज वाढ होताना दिसत आहे. मुंबई आणि राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा आवर्जून वापर करावा, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली आहे.

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! कतरिना, आदित्य नंतर किंग खान शाहरूखही कोरोना पाॕझिटिव्ह

देशात जरी कोरोनाची तिसरी लाट मंदावली असली तरी कोव्हीडचा धोका कायम आहे. बॉलिवूडमध्ये मात्र कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

CNN न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, शाहरूख खानला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत अद्याप शाहरूखच्या टीमकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

राज्यसभेसाठी भाजपची पार पडली महत्त्वाची बैठक; तिसरी जागा आम्हीच जिंकणार, शेलारांचा दावा

राज्यसभा निवडणुकीची चुरस आता आणखी वाढली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्यामुळे जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.  राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिसरी जागा आम्हीच जिंकू, सेनेचे संजय जिंकणार नाही, असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला.

डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण, ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादगिरी कॅमेऱ्यात कैद

तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे ड्युटीवर असताना एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलनं फूड डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयला कानाखाली मारताना दिसत आहे. आता प्रशासनाने या हवालदारावर कारवाई करत त्याची शहरातील पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

विस्थापित काश्मिरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्राधान्याने प्रवेश; जागा वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

काश्मिरी पंडितांच्या विस्थापित झालेल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील. प्रसंगी प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

पंकजा मुंडे विधानपरिषदेसाठी परळी विधानसभेचा दावा सोडणार?

विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यास संधीचे सोने करीन, अशी भावना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली असली तरी त्यांना त्यासाठी अनेक पक्षांतर्गत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. ही उमेदवारी मिळाल्यास २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या दाव्यावर पाणी सोडावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील मंत्री व भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून २०१९ मध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना व्यक्त झालेल्या पंकजा मुंडे यांनी मागच्या दाराने विधानपरिषदेत जाऊन संघर्ष टाळल्याची राजकीय टीका झेलावी लागणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.