उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आहाराकडं पुरेसं लक्ष देतोच असं नाही. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसतं. आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश असतो. परंतु, काही पदार्थ असे आहेत की ज्याचं सेवन हे मर्यादित असेल तरच ते पदार्थ आरोग्यासाठी हितावह ठरतात. हृदय, लिव्हर, किडनी हे आपल्या शरीरातले महत्त्वाचे अवयव आहेत. काही पदार्थ अतिप्रमाणात सेवन केले तर या अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते. अन्नपचन तसंच पचनसंस्थेतून येणारं रक्तातील विविध पोषकतत्त्वांचं विघटन करून ते योग्य स्वरूपात रुपांतरित करण्याचं काम लिव्हर अर्थात यकृत करतं. पण काही पदार्थांच्या अतिसेवनामुळे लिव्हरचं कार्य बिघडू शकतं. त्यामुळे असे पदार्थ आहारात मर्यादित प्रमाणात समाविष्ट असणं गरजेचं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे.
गेल्या काही वर्षांत लिव्हरशी निगडित आजार वाढताना दिसत आहेत. लिव्हर खराब होणं, फॅटी लिव्हर हे आजार वाढत आहेत. लिव्हर खराब झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. लिव्हर खराब होण्याच्या 70 टक्के प्रकरणांमध्ये हिपॅटायटिस , हिपॅटायटिस बी, सी चा संसर्ग कारणीभूत मानला जातो. परंतु, 30 टक्के प्रकरणांमध्ये चुकीच्या आहार लिव्हर खराब होण्यास कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं. काही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यानं तसेच ड्रिंकमुळं लिव्हरवर परिणाम होतो. यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर खराब होते. लिव्हरशी संबंधित आजारांवर वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. काही केसेसमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय असतो.
सध्याच्या काळात लोकांकडे वेळेचा अभाव असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पॅक्ड फूड अर्थात पाकिटबंद अन्नपदार्थांकडे कल वाढत आहे. परंतु, पाकिटबंद अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकावेत यासाठी त्यात मीठ आणि साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तसेच प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. असे पदार्थ सातत्यानं खाल्ल्यानं लिव्हरवर परिणाम होतो. फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास डायबेटिसचा धोका वाढतो. तसेच या पदार्थांमुळे लिव्हरवर प्रतिकूल परिणाम होतो. तुमचं लिव्हर साखरेचं फॅटमध्ये रूपांतर करण्याचं काम करतं. त्यामुळे गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास फॅटही वाढतात. यामुळे फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते.
लिव्हर खराब होण्यामागं अल्कोहोल हे सर्वात मोठं कारण मानलं जातं. सध्याच्या काळात पार्ट्यांच्या नावाखाली अल्कोहोल घेण्याकडे वेगानं कल वाढतो आहे. काही लोकांना रोज मद्यपान करण्याची सवय असते. परंतु, अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होतं. त्यामुळे कधीतरी मद्यपान करणं ही धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही बिअर, वाइन किंवा कोणत्याही स्वरूपात अल्कोहोल घेत असाल तर ही सवय तातडीनं बदलणं आवश्यक आहे.
आरोग्यासाठी ड्रायफ्रूट्स फायदेशीर मानले जातात. परंतु, प्रमाणापेक्षा अधिक ड्रायफ्रूट्स खाणं फॅटी लिव्हरला आमंत्रण ठरतं. मनुका तसेच अन्य ड्रायफ्रूट्स मध्ये फ्रॅक्टोज मुबलक असतं. त्यामुळे रक्तात असामान्य फॅट्स वाढू लागतात. तसेच यामुळे फॅटी लिव्हर होण्याची शक्यता देखील वाढते.
नॉनव्हेज आवडणाऱ्या व्यक्ती रोजच्या आहारात मीट अर्थात मांस खाणं पसंद करतात. परंतु, ही सवय लवकरात लवकर सोडणं गरजेचं आहे. मीटमधले प्रोटीन आपल्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अपायकारक असतात. लिव्हरमध्ये हे प्रोटीन लवकर नष्ट होत नाहीत. अतिरिक्त प्रोटीनमुळे लिव्हरमध्ये विषारी ठरतं. यामुळे लिव्हरला सूज येणं, फॅटी लिव्हर किंवा लिव्हर खराब होण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.