उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 2019 साली भाजप-शिवसेना यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली, पण निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकासआघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षांमध्येच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 39 आमदार आणि काही अपक्षांसह बंड केलं, ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं.
या अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमक्या काय चुका झाल्या, त्यावर एक नजर टाकूयात.
आमदारांची संवाद नाही
या अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेसह घटकपक्षांच्या आमदारांनीही उद्धव ठाकरे संवाद साधत नसल्याची तक्रार केली होती.
फेसबूक संवाद हीच इमेज
कोरोनाचा विळखा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी फेसबूकवरून जनतेशी संवाद साधला, या संवादाच्या माध्यमातून त्यांनी दिलासा द्यायचा प्रयत्न केला, पण आमदारांसोबत समोरासमोर संवादाचा अभाव दिसून आला.
संजय राऊत हिरोचे व्हिलन
महाविकासआघाडी स्थापन करताना संजय राऊत हे हिरो ठरले होते, पण सरकार पडताना संजय राऊत हे व्हिलन ठरले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला केला.
सरकारमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा
महाविकासआघाडी स्थापन होतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वाची खाती देण्यात आली. गृहखातं आणि अर्थखातं या दोन महत्त्वाच्या खात्यांमुळे सरकारमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. त्या तुलनेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडता फारशी महत्त्वाची खाती मिळाली नाहीत.
निधीवाटपाच्या तक्रारींची दखल नाही
शिवसेनाच नाही तर काँग्रेसच्या आमदारांनीही अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीवरही टीका केली. अजित पवार निधी देताना भेदभाव करतात, असे आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी केले. याची तक्रारही दोन्ही पक्षांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
हिंदुत्व सोडल्याची टीका
या अडीच वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे भाजपने शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना अनेक वेळा त्यांनी हिंदूत्व सोडलं नसल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं, ज्यात शिवसेना अनेक वेळा बॅकफूटवर दिसली.
संघटनेमध्ये कनफ्यूजन
महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेवर अन्याय होत असल्याच्या भावना अनेक आमदार, खासदार आणि दिग्गज नेत्यांनी बोलून दाखवल्या. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेले आमदार दिवसेंदिवस वाढत होते. सुरूवातीला शिवसेनेलाच महाविकासआघाडीमधून बाहेर पडायचं आहे, त्यामुळे ही स्ट्रॅटेजी अवलंबली असल्याचं बोललं गेलं, पण उद्धव ठाकरेंनाच शिवसैनिकांमध्ये झालेलं हे कनफ्यूजन दूर करावं लागलं.
दोन्ही ठाकरे सरकारमध्ये संघटनेवर दुर्लक्ष
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सरकारमध्ये यायचा निर्णय घेतला, पण सरकारमध्ये आल्यानंतर संघटनेवर कंट्रोल ठेवणारा पक्षाध्यक्ष ठेवण्याची गरज होती, पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही.
फडणवीसांसारखा तगडा विरोधक
सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं, यानंतर विरोधी पक्षनेते पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं. फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरण, नवाब मलिक प्रकरण आणि सरकारी वकिलांचं स्टिंग ऑपरेशनमुळे सभागृह दणाणून सोडलं. सचिन वाझे आणि स्टिंग ऑपरेशन प्रकरणामध्ये तर सरकारला फडणवीसांच्या प्रश्नांना उत्तर द्यायलाही अडचणी येत होत्या.
वर्क फ्रॉम होम
कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम केलं. यानंतर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे उद्धव ठाकरे जवळपास दोन अधिवेशनांमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. आजारपणामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभारही दुसऱ्या कोणाकडे दिला नाही. मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये येतच नसल्याची टीका विरोधकच नाहीत तर सत्तेतल्या आमदारांनीही केला. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्यामुळे नोकरशाहीवर त्यांचा कंट्रोल नसल्याचा मेसेजही गेला.