नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या 50 हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानासाठी १० हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येऊनही विविध निकष लावून शेतकऱ्यांची जणू क्रूर चेष्टा केली जात आहे. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदानाचा निर्णय येत्या आठवड्याभरात घ्या अन्यथा सरकार कोणाचेही येवो 13 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे.
मात्र, हे अनुदान देत असताना लावलेल्या अटींवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पोलखोल केली आहे. त्यामुळे 13 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण ही सरळ सरळ अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे, त्यांना हे अनुदान मिळणार नाही अस हे परिपत्रक सांगत आहे. नियमित कर्ज भरणारे 95 टक्के शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पण हेच शेतकरी या मध्ये पात्र होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.