दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यात
१२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के
राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. १ ते १० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या एक आहे. पाच शाळांमध्ये १० ते २० टक्के निकाल लागला. ४ शाळांमध्ये २०-३० टक्के निकाल लागला आहे. १८ शाळांमध्ये ३०-४० टक्के, ३८ शाळांचा निकाल ४०-५० टक्के, ४१ शाळांचा निकाल ५०-६० टक्के निकाल, १२३ शाळांचा निकाल ६०-७० टक्के लागला. याशिवाय ७०-८० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२१, ८०-९० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १३३०, ९०-९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या शाळांची संख्या ८ हजार ८०१ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये
ऑनर किलिंग, भावाने बहिणीला संपवले
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या हट्टी गावांमध्ये रमेश हालोर यांचं कुटुंब रहातं. रमेश यांची मुलगी पुष्पा हीचं एक तरुणावर प्रेम होतं. पुष्पाला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न करूनही ती प्रियकराला सोडायला तयार नव्हती. अशातच ती घरातून निघून गेली. पुष्पा घरातून निघून गेल्याने त्याचा भाऊ संदीप हालोर संतापला. त्याने मित्रांच्या मदतीने पुष्पाला शोधून काढले. पुष्पाला मोटरसायकलवर निर्जन स्थळी एका टेकडीसारख्या ठिकाणी संदीप हा पुष्पाला घेऊन गेला. तिच्या साडीचं एक टोक त्याने तिथल्या झाडाला बांधलं आणि दुसरं टोक पुष्पाच्या गळ्याभोवती बांधून तिला उंचावरुन ढकलून दिलं. यात गळफास लागून पुष्पाचा मृत्यू झाला. पुष्पाचा जीव जात नाही तोपर्यंत संदीप त्याच ठिकाणी झाडाजवळ उभा होता. पुष्पाचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्याने आपलं घर गाठलं.
देशभरातील विरोधानंतरही भारतीय सेना ठाम, 2 दिवसांमध्ये सुरू होणार प्रक्रिया
लष्करातील भरतीबाबतच्या अग्निपथ अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध सुरू आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसलाय. या विरोधानंतरही या योजनेच्या अमंलबजावणीवर लष्कर ठाम आहे. थल सेना प्रमुख मनोज पांडे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे.
राष्ट्रपती पदासाठी देशात शरद पवारांशिवाय इतर तगडा उमेदवार उरलाय का? – राऊत
देशात १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. याआधी आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुढाकार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच भाजपसह इतर सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर निवडणुकीतली हवाच निघून गेली आहे. पवारांनी नाही म्हटल्यामुळं देशात कुणी इतर तगडा उमेदवार उरलाय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला आतापर्यंत मोजकेच राष्ट्रपती चांगले मिळाले. अन्यथा नेहमीच सत्ताधारी पक्षानी आपल्या मर्जीतील नेत्याला राष्ट्रपती पदावर निवडून दिलं आहे. यंदा शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर निवडणुकीत रंगत आली असती, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता. या मोर्चाचा गाजावाजा पाहता पोलीसही सतर्क झाले होते. त्यामुळे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पण मोर्चाचा ठरवलेला वेळे निघून 2 तास झाले तरी महिला जमेनात. मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्याच जास्त होती. विशेष म्हणजे या मोर्चाकडे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवलेली दिसली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता या आंदोलनात सहभागी झालेलं दिसलं नाही.
लहान मुलांनाही आता
डिप्रेशनचा धोका
अनेक तरुण मुलंही वेगवेगळ्या कारणाने डिप्रेशनमध्ये जात असल्याचं समोर आलं. आता तर जागतिक आरोग्य संघटनेनं धक्कादायक अहवालच समोर आणला आहे. डिप्रेशनचा आता लहान मुलांनाही धोका आहे. अगदी 5 वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत डिप्रेशनचा धोका आहे. लहान मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढत जात असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. जगात 14 टक्के तरुण कोणत्या ना कोणत्या कारणाने डिप्रेशनचे शिकार आहेत. 5 ते 9 वर्षांमधील मुलांचं डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण 8 टक्के आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिक यांना
मतदान करण्याची परवानगी नाकारली
महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मोठा धक्का बसला आहे. कारण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना आगामी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.
मुंबई उच्च न्यायदालनात
माजी सैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
संपत्तीच्या वादातून एका ५५ वर्षांच्या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायदालनात सुनावणी सुरू असतानाच आत्महत्येचा प्रयत्न केला. तुषार शिंदे असे या माजी सैनिकाचे नाव आहे. आईशी सुरू असलेल्या संपत्तीच्या वादातुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या एकलपीठासमोर त्याच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. मात्र आदेश विरोधात गेल्याने त्यांनी न्यायामूर्तींच्या दिशेने जाऊन कटरने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती आहे
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या
भावाच्या घरावर सीबीआयचे छापे
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर आणि दुकानावर सीबीआयने छापे टाकले आहेत. अग्रसेन गहलोत यांच्यावर २००७ ते २००९ दरम्यान खते बनवण्यासाठी लागणारे पोटॅश शेतकर्यांना वाटण्याच्या नावाखाली सरकारकडून अनुदानावर विकत घेतले आणि ते उत्पादन खाजगी कंपन्यांना विकून नफा कमावल्याचा आरोप आहे.
आईची काळजी घेण्यासाठी थांबायचं,
राहुल गांधी यांची विनंती
नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान तीन दिवस सलग चौकशी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ईडीकडे २० जूनपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली. ईडीने राहुल गांधी यांची विनंती मान्य केली आहे. राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना आपल्याला गंगाराम रुग्णालयात आईची काळजी घेण्यासाठी थांबायचं असल्याचं सांगितलं.
साताऱ्यात तिहेरी हत्याकांड, महिलेची हत्या
करुन दोन मुलांना विहिरीत ढकललं
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात वेलंग शिरंबे या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. योगिता नामदास नावाची महिला आपल्या दोन मुलांसह तिचा प्रियकर दत्ता नामदास याच्यासोबत राहत होती. काल या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांना घटनेचा तपास सुरू केल्यानंतर घराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीत या महिलेच्या दोन्ही मुलांचे मुतदेह आढळून आले. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
SD social media
9850 60 3590