बाबर आझमनं टाकलं विराटला मागं

पाकिस्ताननं बुधवारी रात्री झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव केला. यजमान टीमच्या या विजयात त्यांचा कॅप्टन बाबर आझमची भूमिका महत्त्वाची होती. त्यानं 103 रनची खेळी करत वन-डे कारकिर्दीमधील 17 वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर बाबरनं यावेळी टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा रेकॉर्ड देखील मोडला. मुलतानमध्ये झालेल्या या वन-डे मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करत 305 रन केले होते. पाकिस्ताननं 306 रनचं लक्ष्य 4 बॉल राखत पूर्ण केलं.

बाबरचा रेकॉर्ड

बाबरनं या सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन म्हणून वन-डे क्रिकेटमध्ये 1000 रन पूर्ण केले. त्यानं ही कामगिरी 13 इनिंगमध्ये पूर्ण केली. वर्ल्ड क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वात जलद हजार रन करणारा बाबर हा पहिला कॅप्टन बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड विराटच्या नावावर होता. त्यानं कॅप्टन म्हणून 17 इनिंगमध्ये 1000 रन पूर्ण केले होते. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एबी डीव्हिलियर्स (18) असून  केन विल्यमसन (19) आणि एलिस्टर कूक (20) यांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक आहे.

बाबरनं यावेळी शतक पूर्ण करताच वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. बाबरचं हे सलग तिसऱ्या वन-डेमध्ये शतक आहे. यापूर्वी त्यानं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन वन-डेमध्ये शतक झळकावलं होतं. त्यानं यापूर्वी वेस्ट इंडिज विरूद्ध 2016 साली शतकांची हॅट्ट्रिक केली होती.

होपचे शतक व्यर्थ

यापूर्वी वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ओपनर शाई होपच्या शतकामुळे वेस्ट इंडिजनं 8 आऊट 305 रन केले. होपनं 134 बॉलमध्ये 15 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 127 रन काढले. त्यानं शामार ब्रूक्ससोबत दुसऱ्या विकेट्ससाठी 154 रनची भागिदारी करत टीमला चांगला स्कोर करून दिला. अखेर, बाबरच्या फॉर्मपुढे त्याचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.