ठाकरे सरकारच्या कारभारामुळे खासगी डेअऱ्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका

राज्यात दुधाचे उत्पादन कमी होत चालले असल्याने शासन स्तरावर मोठ्या योजना आणण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आखत असताना मात्र खासगी डेअऱ्यांनी आपला मनमानी कारभार सुरू केला आहे. जागतिक दूध दिन म्हणजे काल 1 जूनपासून दूध खरेदी दरात 1 रूपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधीच घाईला आलेला शेतकरी अजून खचला जाणार आहे.

दरम्यान राज्यातील खासगी दूध डेअऱ्यांनी एका महिन्यात तब्बल चार रूपये दर कमी करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. गायीच्या दूधखरेदीचा दर लिटरला 36 वरून तीन रुपयांनी कमी करीत प्रथम 33 करण्यात आला. मात्र, सरकारचे नियंत्रण नसल्यामुळेच खासगी डेअऱ्यांकडून मनमानी पध्दतीने दूध खरेदीदर कमी केले जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दै. पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, खासगी डेअऱ्यांकडून गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटरला एक रुपयाने कपात करून तो 33 वरून 32 रुपये करण्यात आला आहे. आजपासून म्हणजे 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करीत अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर आणखी भार दिला जात आहे. महिनाभरात खासगी डेअऱ्यांकडून लिटरला चार रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दूध पावडर आणि बटरच्या दरातील घसरणीमुळे गायीच्या दूध खरेदीदरात कपात करण्यासाठी खासगी डेअऱ्या पुढे सरसावल्या आहेत.

खासगी डेअऱ्यांनी दर कमी केल्यामुळे सहकारी दूध संघांनीही दर कमी करीत 33 रुपये केले. ते तूर्तास कायम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खासगी डेअऱ्यांनी दर कपात केल्याने अधिक दर असलेल्या सहकारी संघांकडील दूधसंकलन वाढते आणि त्यांनाही फटका बसतो, असेच चित्र पुन्हा उभे राहिले असून, काही मोजके खासगी डेअरीमालकच दरकपातीस पुढाकार घेत असल्याची ओरड दुग्धवर्तुळात सुरू झालेली आहे. राज्य सरकारने दुग्ध उद्योगाच्या अडचणींवर निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठन गेल्याच आठवड्यात केली आहे.

मात्र, दूध खरेदी दराबाबत कोणाचाच धाक खासगी डेअऱ्यांना नसल्याने ‘आम्ही करू तीच पूर्वदिशा’ अशा अविर्भावात काही खासगी डेअरीमालक मनमानी करीत असल्याचा आरोप दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वर्तुळातूनच व्यक्त केला जात आहे. त्यांना अटकाव घालण्यासाठी शासनाकडूनच कायदेशीर बंधनाची आवश्यकता बोलून दाखविली जात आहे.

शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री, ग्राहकांना भुर्दंड

दूध पावडरचे प्रतिकिलोचे दर वीस रुपयांनी कमी होत आज 260 रुपयांवर आले आहेत. तर, बटरचा किलोचा भाव तीस रुपयांनी कमी होत 350 रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाढीव भावात दूध खरेदी करणे शक्य नसून खरेदी दर कमी करावे लागत असल्याची प्रतिक्रिया एका दूध पावडर उत्पादकाने व्यक्त केली. असे असले तरी दुधाचा विक्री दर प्रतिलिटरला पूर्वीइतकाच म्हणजे 50 ते 52 रुपयांवर स्थिरच ठेवण्यात आल्याने एकीकडे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री आणि ग्राहकांना जादा दराचा भुर्दंड असेच चित्र कायम असल्याने हाच चर्चेचा विषय झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.