रसगुल्ला म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. अनेकांच्या आवडीचा पदार्थ असलेला रसगुल्ला अनेकदा चांगल्या क्षणांचा आनंद द्विगुणीत करतो. पण या रसगुल्ल्यामुळे कुणाला रडू आल्याचं ऐकलं आहे का? तसंही जगात घडलंय. कुणा व्यक्तीला नाही तर भारतीय रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांवर ही वेळ आली आहे. भारतीय रेल्वेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. बिहारच्या लखीसराय येथील बरहिया रेल्वे स्थानकावर अनेक स्थानिकांनी सुमारे 40 तास निदर्शने केली. स्थानिक लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन केल्याने 40 तास रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हावडा-दिल्ली रेल्वे मार्गावरील डझनभर गाड्या 24 तासांसाठी रद्द कराव्या लागल्या, तर 100 हून अधिक गाड्या इतर मार्गांवरून वळवाव्या लागल्या. यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला. ‘झी न्यूज’ हिंदीने याबबातचं वृत्त दिलं आहे.
लखीसरायचे जिल्हाधिकारी संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार बरहिया येथे मोठ्या संख्येने लोक स्टेशनवर ट्रॅकवर बसले होते. बरहिया येथे अनेक एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्याने त्यांनी आंदोलन केले. या स्थानकावर स्थानिकांच्या सोयीसाठी नियोजित थांबे केले जावे, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. बरहिया येथील स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाला सकारात्मक फळ मिळाले आहे. माध्यमांतील रिपोर्टनुसार रेल्वेने एक्स्प्रेस ट्रेनला येथे थांबा देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. रेल्वेच्या या आश्वासनानंतर सोमवारी (23 मे 22) संध्याकाळी आंदोलन मागे घेण्यात आलं.
आंदोलनाचा आणि रसगुल्ल्याचा काय संबंध?
लखीसरायचा रसगुल्ला देशभरात अतिशय प्रसिद्ध आहे. येथील मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागणीनुसार ती जवळच्या इतर राज्यांतदेखील पाठवली जाते. कोणीही लखीसरायला भेट दिली तर येथील लोक आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार इथले प्रसिद्ध रसगुल्ले देऊन करतात. विशेषत: लग्न असो किंवा कोणताही खास प्रसंग या ठिकाणी रसगुल्ल्याची मेजवानी ठरलेली असते. या व्यवसायची जवळपास 200 हून अधिक दुकानं येथे आहेत आणि दररोज मोठ्या प्रमाणात रसगुल्ले तयार केले जातात.
रेल्वे गाड्या न थांबवल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम
येथील स्टेशनवर रेल्वे गाड्या न थांबल्याने या रसगुल्ला व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पुरवठा न झाल्याने त्यांचे ग्राहकही संतप्त झाले आहेत. कोविडच्या काळातही बरहियामध्ये गाड्या न थांबल्याने मिठाईच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला होता. रेल्वे स्थानकावर सध्या एकही गाडी थांबत नसल्याने स्थानिक नागरिक आणि मिठाईवाले संतप्त झाले आहेत.
सार्वजनिक वाहतुकीमुळे वाढतोय व्यापाऱ्यांचा खर्च
रसगुल्ला व्यापारी रंजन शर्मा यांनी सांगितले की, बरहिया ते पाटणा रेल्वेचं भाडं 55 रुपये आहे आणि हे अंतर कापण्यासाठी फक्त दोन तास लागतात. मात्र हाच प्रवास रस्त्याने सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून केला तर एकूण भाडे 150 रुपये लागते आणि वेळही दुप्पट लागतो. याशिवाय कॅब किंवा कार बुक करण्याचा पर्याय निवडल्यास तो आणखी महाग होईल. आता लग्नसराईच्या काळात रसगुल्ल्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे हा खर्च आणखी वाढतो.
शेवटी रेल्वेने लेखी आश्वासन देऊन रसगुल्ला व्यापाऱ्यांना गोड बातमी दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.