हिंदू सत्याचा शोध घेतो, हिंदुत्ववादी
सत्ता शोधतात : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजस्थानच्या जयपूरमध्ये एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे सुनावले आहे. जयपूरमध्ये ‘मेहंगाई हटाओ महा रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही,” असं ते म्हणाले. हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरक हा आहे की हिंदू सत्याचा शोध घेतो, त्याला सत्याग्रह म्हणतात. तर, हिंदुत्ववादी सत्ता शोधतात आणि त्याला सत्ताग्रह म्हणतात,” असं राहुल गांधी म्हणाले.
मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक
आहे, पण तिचा बापजादा मी आहे..
माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार पुढे म्हणाले, “अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं वाटतं. आपण काही केलं असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे.”
महामारीचा धोका
अजूनही कायम : डॉ. पूनम
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “नवीन व्हेरिएंट आलाय याचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु परिस्थिती नक्कीच अधिक अनिश्चित असेल. डॉ. पूनम म्हणाल्या, “महामारीचा धोका अजूनही कायम आहे. करोनाचे नवीन व्हेरिएंट आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत असलेली करोनाबाधितांची संख्या यामुळे जागतिक स्तरावर करोनाचा धोका कायम आहे.
आंध्र प्रदेश, चंदीगडमध्येही
ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला
महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये देखील करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण सापडला आहे. आयर्लंडमधील ३४ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या रुग्णाची शनिवारी आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली होती. तसेच त्याला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दुसरीकडे चंदीगडमध्येही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.
मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या
२२ जणांच्या कुटुंबीयांनी नोकरी
मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या ४२ आंदोलकांना आर्थित मदत तसंच सरकारी नोकरी देण्याच्या निर्णयाची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ४२ पैकी २२ जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. इतर २० आंदोलकांच्या कुटुंबीयांनी नोकरीचा अधिकार राखीव ठेवला असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांना १० लाखांची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.
आरक्षण नाही तर मतदान नाही,
आता मत मागायला येऊ नका
आरक्षण नाही तर मतदान नाही, आता मत मागायला येऊ नका, अशा पाट्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओबीसींच्या घरावर लागल्या आहेत. या पाट्या पाहून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मैदानात असलेले उमेदवारही हादरले आहेत. मागास प्रवर्गातील निवडणुका स्थगित झाल्याने ओबीसी समाजाकडून असा संताप व्यक्त होत आहे़. राज्य सरकारच्या वटहुकमाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली़. राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून नामाप्र प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती
चिंताजनक असली तरी स्थिर
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात वरुण सिंग एकमेव बचावले आहेत. या घटनेत चिफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर ११ जणांनी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये प्राण गमावले. ग्रुप कॅप्टन सिंग यांच्यावर बेंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
किती दिवस आणि किती वेळा
हे सहन करायचे? : फडणवीस
आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ संपतो ना संपतो तोच आता म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्य सरकारवर विरोधी पक्ष भाजपाकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त करत, राज्य सरकारला सवाल केला आहे. “भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?” असं फडणवीस म्हणाले आहेत.
SD social media
9850 60 3590