राज्यावर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे.
वायव्येकडून येणारे कोरडे वारे आणि हवेत वाढलेली आद्र्रता यांमुळे मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत पावसाने हजेरी लावली. कुलाबा येथे सकाळी ८७ टक्के तर सायंकाळी ८१ टक्के आद्र्रता नोंदवली गेली. तसेच सांताक्रूझ येथे सकाळी ७६ तर सायंकाळी ६७ टक्के आद्रतेची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे गुरूवारी ३२.६ अंश सेल्सिअस कमाल आणि अनुक्रमे २६ आणि २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. तापमान सर्वसाधारण असले तरीही वाढलेल्या आद्र्रतेमुळे गुरूवारी सकाळपासूनच उष्णता जाणवत होती; मात्र दिवसभर हवामान ढगाळ होते.
कोकणपट्टीच्या काही भागांत पावसाचा हलका शिडकावा झाला. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात आकाश ढगाळ असेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्यता आहे. आद्र्रतेमुळे ढग निर्माण झाल्याने मुंबई परिसरात काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. सायंकाळी हवेत थंडावा जाणवत होता. पुढील तीन-चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
सध्या पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लगतच्या भागापासून पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो राज्याच्या इतर ठिकाणीही सरकू शकतो. परिणामी पुढील चार दिवस राज्यातील सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळीची शक्यता आहे.