पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला रोखणं काँग्रेसला शक्य झालं नाहीच. सोबतच पंजाबमधील सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली. आम आदमी पक्षासमोर काँग्रेस भूईसपाट झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. जवळपास चार तास चालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अखेर सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसची सगळी सूत्र ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं !, तशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसल्यानंतर काँग्रेस नेतृत्वात मोठे बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस संसदीय मंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीही सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीत पाच राज्यातील पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा झाली. महत्वाची बाब म्हणजे या बैठकीत काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय झाला. तसंच येत्या काळात काँग्रेस देशपातळीवर चिंतन शिबिर घेणार असल्याचंही कळतंय. इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी आता सक्रिय व्हावे असा सूरही या बैठकीत उमटल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, सोनिया यांचा राजीनामा सर्वांनी फेटाळून लावला. सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अजय माकन आणि आनंद शर्मा यांनी एक पाऊल मागे घेत, आमचा सल्ला हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजलं जाऊ नये, असं म्हटलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेस कार्यकारिणीने सर्वानुमते सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावं असा निर्णय घेतला. काँग्रेस पक्ष लवकरत चिंतन शिबरांचं आयोजन करेल, अशी माहितीही त्यांनी दिलीय.