उत्तर प्रदेशसह देशाच्या पाच राज्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता गांधी परिवारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनिया गांधी याच्याऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जावं, अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यातच अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केलाय. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्त्व करायला हवं, असं मत अशोक गेहलोत यांनी व्यक्त केलंय.
पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर दुसरीकडे भाजपनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसवर पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. अशातच काँग्रेसचे वरीष्ठ नेता अशोक गेहलोत हे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदावरुन होत असलेलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या सुरु असून या बैठकीत पाचही राज्यात झालेल्या पराभवांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाते आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडतेय.
काँग्रेस पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी अध्यक्षपदी काँग्रेच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातीलच व्यक्ती असणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं असून मी सध्या जे करतो, तेच माझ्यासाठी चांगलं आहे, असंही अशोक गेहलोत यांनी म्हटलंय.
पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. यूपीसह, मणिपूर, गोवा या राज्यात भाजपनं मुसंडी मारली होती. मात्र भाजपच्या या विजयामागे मतांचं ध्रूवीकरण झालं असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच गांधीच्या विचारांवर चालत आला आहे. राज, धर्म यावर काँग्रेसनं निवडणुका लढलेल्या नाहीत. सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी माध्यमांवरही हल्लाबोले केला आहे. मीडिया पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे पंजाबात काँग्रेससह प्रस्थापितांना मात देणाऱ्या आप पक्षाचा काँग्रेसला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणालेत. मीडिया आपला वाढीव कव्हरेज देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.