देशातील कोरोनाविरोधी लढ्यात नवे शस्त्र मिळाले आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) ‘कोवोव्हॅक्स’ लसीचा आपत्कालीन वापर करण्यास सरकारडून मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अँटी-कोविड लस ‘कोवोव्हॅक्स’ला आपत्कालीन वापर करण्यास (EUA) मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे देशातील मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीमधील अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
यापूर्वी 28 डिसेंबर रोजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपत्कालीन परिस्थितीत प्रौढांसाठी Covovax लसीचा मर्यादित वापर करण्यास मान्यता दिली होती. मात्र देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत अद्याप या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही. सीरम इन्स्टीट्यूटमधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी 21 फेब्रुवारी रोजी DCGI कडे अर्ज सादर केला होता. त्यांनी देशातील 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्सचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या कोविड-19 वरील विषय तज्ञ समितीने शुक्रवारी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या अर्जावर व्यापक चर्चा केली. याच चर्चेनंतर कोवोव्हॅक्स लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली. ही शिफारस DCGI कडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. या लसीमुळे देशात मुलांच्या लसीकरणाला गती मिळवून देश कोरोनाविरोधी लढण्यास सक्षम बनणार आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्युटचे सिंह यांनी सांगितले की, 12 ते 17 वर्षे वयोगटातील सुमारे 2,700 मुलांवरील दोन अभ्यासांतून असे दिसून आले आहे की कोवोव्हॅक्स ही लस अतिशय प्रभावी आणि सुरक्षित आहे.
कोवोव्हॅक्स लसीला मान्यता केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरेल. जगासाठी भारतात पुरेशा लसीचे उत्पादन करण्याचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करेल. आमचे सीईओ अदार पूनावाला यांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने आम्हाला विश्वास आहे की कोवोव्हॅक्स लस आपल्या देशातील आणि जगातील मुलांचे कोरोनापासून संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास सीरम इन्स्टिट्युटचे सिंह यांनी व्यक्त केला आहे.