आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2022-23 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार मुलांचा प्रवेश घेण्यासाठी आता 10 मार्च 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009” अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांना अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. परंतु, ही मुदत आता 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय (Age limit) निश्चित करण्याबाबत 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी 28 फेब्रुवारी 2022 व 3 मार्च 2022 च्या शासकीय पत्रानुसार आर.टी.ई.25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा 31 डिसेंबर 2022 रोजी पुढीलप्रमाणे राहील.
‘प्लेग्रुप / नर्सरी’ साठी आता किमान वय 3 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
‘छोटा शिशु’ (ज्युनियर केजी) साठी आता किमान वय 4 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 5 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
‘मोठा शिशु’ (सिनियर केजी) साठी आता किमान वय 5 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 6 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे.
यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.
‘इयत्ता पहिली’ साठी आता आता किमान वय 6 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत बालकाचा जन्म हा 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधी दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे.