महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैजनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैजनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैजनाथाची महापूजा पार पडणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय. मंदिर परिसरात 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. 20 पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड आणि आरसीपीची तुकडी तैनात करण्यात आलीय. महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथाचे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांनी गर्दी केलीय.
नाशिक महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन केले आहे.
अकोला शहराचे आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवा निमित्त मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली असून दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांचा जनसागर उसळणार आहे. अकोला शहरातील राजराजेश्वाराचे मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून मंत्रिरात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी राहणार आहे.
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर दोन वर्षानंतर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली तर शिवमंदिर आणि सभामंडप विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आला आहे. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन आज महाशिवरात्रीचा उत्साह भाविकांमध्ये पहायला मिळत असुन आज मंदिर रात्री आणि दिवसभर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.
महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर महादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा, झेंडू अशा विविध पाना-फुलांनी सजवले आहे. ही सजावट श्री विठ्ठल भक्त कोळी यानी केली असून या सजावटीसाठी जवळपास एक टन बेलपत्राच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच रुक्मिणी मातेचा गाभारा सुंदर असा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी आणि बेलपत्रांने सजवण्यात आला आहेय तसेच विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे. तर रुक्मिणीमातेला दुधाळ रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे त्यामुळे सावळ्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.