जगाला विनाशाच्या खाईकडे नेणारे रशिया – युक्रेन युद्ध भडकताच एकीकडे शेअर बाजार गडगडला तर दुसरीकडे सोने सर्वोच्च दरावर गेलेले दिसले. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह 10 ग्रॅमच्या मागे 53 हजारांवर गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50980 वर गेला. ही गेल्या वर्षातली सर्वोच्च भाववाढ आहे, अशी माहिती दी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. येणाऱ्या काळात सोन्याचे दर वाढू शकतात. कारण एकीकडे महागाई वाढत आहे. शेअर बाजाराची विश्वासार्हता नाही. हे पाहता गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51110 रुपये नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर 46850 रुपये नोंदवले गेले. मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51110 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46850 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. विशेष म्हणजे या दरावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल.
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जागतिक पातळीवर युद्धाची शक्यता आहे. शेअर बाजाराबाबत लोकांना विश्वास नाही. महागाई वाढलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्याचा परिणाम सोन्याचा भाव वाढ होण्यात होत आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.