सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात गुंतल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक वेगळं रुप आज पहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचार सभेत पोहोचले. त्यावेळी पंतप्रधान मोदी भाजप पदाधिकाऱ्याच्या पाया पडताना दिसून आले! त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचं हे रुप पाहून समाज माध्यमांमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसंच हा व्हिडीओ जोरदार व्हायरलही होत आहे.
पंतप्रधान मोदी उन्नावमध्ये एका प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी पंतप्रधान मोदींना श्रीरामातू मूर्ती भेट स्वरुपात दिली. त्यानंतर कटियार हे पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना थांबवलं आणि पाया न पडण्यास सांगितलं.
इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी स्वत: कटियार यांच्या पायाला स्पर्श केला. श्रीरामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्याच्या पाया पडू नये, असं पंतप्रधान मोदींना यावेळी सुचवायचं होतं, अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरु आहे. दरम्यान, अनेक भाजप नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींच्या कृतीचं कौतुक केलं आहे.
यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे रुप पाहायला मिळालं आहे. कर्नाटकातील एका पुरस्कार वितरण सोहळ्यात एक पुरस्कार विजेती महिला पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्यासमोर नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. 2020 मधील ही घटना आहे.