पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणातील फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीची बहीण पूर्वी आणि तिचा पती मयांक मेहताविरोधात काढलेले अजामीनपात्र वॉरंट विशेष न्यायालयाने तूर्त स्थगित केले आहे. दोघांनी माफीचे साक्षीदार बनत असल्याचे सांगत वॉरंट रद्द करण्याची मागणी केल्याच्या पाश्र्वाभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले.
घोटाळ्यातील सहभागाबाबत विशेष न्यायालयाने परदेशात राहणाऱ्या मेहता दाम्पत्याविरोधात २०१८ मध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर या दोघांनी अर्ज करत आपण या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनण्यास आणि नीरव मोदीविरोधात साक्ष देण्यास तयार असल्याचे एका अर्जाद्वारे न्यायालयाला सांगितले होते. जानेवारी महिन्यात न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली व त्यांना माफी देण्यात आली. दोघेही घोटाळ्याची आणि त्याच्याशी संबंधित सगळी व सत्य माहिती उघड करतील या अटीवर न्यायालयाने त्यांची माफीचा साक्षीदार बनण्याची मागणी मान्य केली आहे. त्यानंतर मेहता दाम्पत्याने त्यांच्याविरोधात बजावलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या या मागणीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विरोध केला होता. दोघेही न्यायालयात हजर झाल्याशिवाय त्यांची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला. न्यायालयाने मात्र मेहता दाम्पत्याविरोधात बजावलेले अजामीनपात्र वॉरंट पुढील सुनावणीपर्यंत स्थगित केले.