नाशिकमध्ये कोरोनाचे मृत्यू सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरानामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तेरा फेब्रुवारीच्या अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत दोन आणि ग्रामीण भागात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 64 हजार 252 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत 1 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 279 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. मात्र, गंभीर रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 125, बागलाण 90, चांदवड 60, देवळा 50, दिंडोरी 115, इगतपुरी 38, कळवण 71, मालेगाव 39, नांदगाव 42, निफाड 171, पेठ 32, सिन्नर 127, सुरगाणा 65, त्र्यंबकेश्वर 65, येवला 96 असे एकूण 1 हजार 186 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 229, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 13 तर जिल्ह्याबाहेरील 44 रुग्ण असून असे एकूण 1 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 598 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिकमध्ये 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार हे बळी गेल्याचे समोर आले आहे. यातले 18 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेलेत, तर 16 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काल 12 फेब्रुवारी रोजी सुद्धा 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. त्यात 3 रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत, तर उर्वरित 2 रुग्ण हे नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे कोरोना नाही म्हणून मास मुक्तीपर्यंतची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये मृत्यूसत्र पाहता, अजून धोका टळला नाही, याची जाणीव सतत होताना दिसतेय.