कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा गदारोळ उडालेला होता. बंडातात्या कराडकर यांनी त्यावेळी बोलताना राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल देखील वक्तव्य केलं होतं. दिवंगत नेते पंतगराव कदम यांचा मुलगा अभिजित कदम याच्या अपघाती निधनाबद्दल आणि सहकारमंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मुलाबद्दल देखील बंडातात्या कराडकर यांनी वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन कराडकर यांच्यावर निशाणा साधलाय.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्री बाबत केलेल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबत केलेले वक्तव्याचा निषेध होणारच आहे. त्यावेळी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या मुला बाबतही त्यांनी वक्तव्य केल्यानंतर स्वतः माझ्या मुलाच्या बाबतही दारू पिण्यावर बेताल वक्तव्य केले होते, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. बंडातात्यांना कल्पना आहे की मागील सात वर्षापासून माझा मुलगा पंढरीची वारी करत आहे, अस असताना चुकीचा आरोप त्यांनी केला याबाबत माझ्या मुलाने बंडातात्या कराडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
अब्रुनुकसानीच्या दावा दाखल करण्यासंदर्भात त्या पद्धतीने निर्णय सुरू आहे. बंडातात्या कराडकर यांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी वकिलांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र, महिलांबाबत असले वक्तव्य त्यांनी केलं आहे. हे सुद्धा आक्षेपार्ह आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र या मागचा बोलवता दुसरा कोण तरी आहे, असे मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेबांच्या बरोबर मी ज्या लोकांबद्दल नाव घेतली. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही किंवा त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं. पोलीस त्यांची ड्युटी करतील. त्यांना आदेश आहेत त्याप्रमाणे ते मला ताब्यात घेतील. आम्ही अटक करून घेऊ, असंही कराडकर यांनी सांगितलं.