आज दि.४ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ
पुरस्कार महाराष्ट्राला

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलीय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.

राज्यातील निर्बंध कमी
होण्याची शक्यता

राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. आता करोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

‘जुमला’ भारतासाठी आणि
‘नोकऱ्या’ चीनसाठी : राहुल गांधी

देशातील विविध मुद्य्यांवरून राहुल गांधींकडून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली जाते. आता त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून आणि मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेवरून टीका केली आहे. ‘जुमला’ भारतासाठी आणि ‘नोकऱ्या’ चीनसाठी! मोदी सरकारने असंघटीत क्षेत्र नष्ट केलं आणि सर्वात जास्त रोजगार संधी निर्माण करणारे एमएसएमई क्षेत्र नष्ट केले आहे. परिणामी ‘Make In India’ आता ‘Buy from China’ झालं आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे.

फेसबुक कंपनीचे सुमारे
230 अब्ज डॉलर्सचे नुकसान

फेसबुकने स्वतःला मेटा बनवणे मार्क झुकरबर्गसाठी फायदेशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे. मेटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक निराशाजनक राहिली. कंपनीचे सुमारे 230 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
मार्क झुकेरबर्गलाही यांनादेखील या नुकसानीचा फटका सहन करावा लागला असून त्यांच्या एकूण मालमत्तेत 23.34 टक्क्यांची घट झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत झुकेरबर्ग $87.7 अब्जसह 12 व्या स्थानावर घसरले आहेत.

बंडातात्या कराड यांच्याविरोधात
पुणे न्यायालयात खटला दाखल

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी वकिलामार्फत बंडातात्यांविरुद्ध पुणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या,
आधी गोळीबार, नंतर कुऱ्हाडीने वार

यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिवरे (Sunil Divare Shoot Dead) यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

ओवेसींवर हल्ल्याच्या
निषेधार्थ धुळ्यात मूक मोर्चा

ओवेसींवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमचे आमदार डॉ. फारुख शहा यांच्या नेतृत्वाखालील मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चानंतर आमदार डॉ. फारुख शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “असदुद्दीन ओवेसी यांच्यावर याआधी देखील त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा ओवेसी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे,” असंही डॉ. फारुख शहा म्हणालेत.

महाराष्ट्रात साखर उत्पादनात
9 लाख टनांची वाढ अपेक्षित

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यांदरम्यान देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांनी साखर उत्पादनाबाबत प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर-जानेवारी महिन्यात 5.64 टक्क्यांच्या वाढीसह 1.87 कोटी टनावर पोहचू शकते. इस्माने 2021-22 मध्ये भारताचे साखर उत्पादन 3.05 कोटी टन होईल असे म्हटले होते.

हरिवंशराय बच्चन यांचे घर विकले

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द 1970 नंतर बहरत गेली. त्यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की लोकांनी अमिताभची स्टाईल, कपडे, बोलण्याची पध्दत सुध्दा अनुसरली असल्याचे मागील अनेक दशकात पाहायला मिळाले आहे. दिल्लीत अमिताभ बच्चन यांच्या आई वडिलांचं सोपान नावाचं घर असल्याची माहिती मिळतेय. तिथं अनेक दिवस हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचं वास्तव होतं. तिथलं घर अमिताभ बच्चन यांनी विकल्याची वृत्त ईटाईम्सने दिलं आहे. दिलेल्या वृत्तानुसार उत्तर दिल्लीत गुलमोहर पार्कमध्ये हे घर होतं. त्या घराचं नाव सोपान होतं. ते घर जवळपास 23 करोडला विकल्याची माहिती आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.