आफ्रिकेमधील टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मागील आठवड्यामध्ये घडली असली तरी यासंदर्भातील खुलासा टाझांनियामधील पोलिसांनी मंगळवारी केला आहे.
दार ए सलेम येथे चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. पोलीस दलाचे प्रमुख असणाऱ्या लजारो मम्बोसा यांनी दिलेल्य माहितीनुसार, मागुफूली यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक शहरामध्ये दाखल झाले होते. सर्वसामान्यांना दर्शन घेता यावं म्हणून दार ए सलेममधील एका स्टेडियममध्ये मागुफूली यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. मात्र या स्टेडियममध्ये नियोजित ठिकाणाहून प्रवेश करण्याऐवजी अनेक जण संरक्षक भिंतींवर चढून प्रवेश करत होती. त्याचवेळी एका बाजूची भिंत पडली आणि एकच गोंधळ उडाला. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झालाय.
टांझानिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागुफूली यांचा मृत्यू हृदयासंदर्भातील विकारामुळे झाला. मात्र विरोधी पक्षाने कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या मेडिकल कॉम्पिकेशनमुळे मागुफूली यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय. भ्रष्टाचाराविरोधातीच कारवाई आणि आपल्या नेतृत्व शैलीमुळे मागुफूली हे टांझानियामध्ये प्रचंड लोकप्रिय होते. १७ मार्च २०२१ रोजी मागुफूली यांचं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मागुफूली यांच्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या सामिया सुलुहू हसन या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत. सामिया या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्यात. सामिया यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून मागुफूली यांना देशाच्या वतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.