काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये प्रचंड थरार पाहायला मिळाला. कर्जत येथे गाडीत चार चोरांची टोळी शिरली. त्यानंतर या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली. यावेळी चोराने एका महिलेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने बॅग देण्यास नकार दिला आणि या चोरांशी झुंज दिली. चोरांनी महिलेला चाकू दाखवला. पण ही हिंमतबाज महिला तरीही चोरांना बधली नाही. तिने या चोरांना प्रतिकार केला. मात्र, चोरांनी या महिलेकडून बळाच्या जोरावर बॅग हिसकावून घेतली. तेवढ्यात एका प्रवाशाने प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही तात्काळ येऊन या पाचही चोरांना अटक केली आणि या पाचही चोरांची पाच दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
काकीनाडा भावनगर एक्सप्रेस कर्जत स्थानकाजवळ आली असता बोगीत काही चोरांनी प्रवेश केला. या चोरांनी प्रवाशांचे सामान लुटण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी प्रवाशांनी चोर चोर अशी ओरड सुरू केल्यानंतर हे चोर पुढच्या डब्यात आले. या डब्यात वसईत राहणाऱ्या जया पिसेही त्यांच्या मुलीसह प्रवास करत होत्या. प्रवाशांचा आवाज कानावर आल्यावर जया यांनी त्यांच्या बॅगा जवळ घेतल्या.
यावेळी जया यांच्या हातात बॅगा पाहून चोरांनी त्यांच्याकडून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. जयाने त्याला प्रतिकार केला. त्यानंतर एका चोराने चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एक सतर्क नागरिकाने चक्क 100 नंबरवरुन पोलिसांना फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने त्वरित या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले.