मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुढील महिन्यात पुन्हा एकदा पुणे दौरा असणार आहे. साधारणपणे महिन्याभरात राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा असेल. राज ठाकरे पुढील महिन्यात 3, 4 आणि 5 तारखेला पुण्यात असणार आहेत. या तीन दिवसांत मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. दरम्यान, पुणे महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेवली असताना राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढल्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या एका भव्य मुलाखतीमधील एका प्रश्नाचा दाखलाही दिला. ‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
(फोटो गुगल)