नाशिकच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव दिलं पाहिजे. विमानतळाला दादासाहेबांचं नाव देण्याची आंबेडकरी जनतेची जुनी मागणी आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येईल, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
रामदास आठवले आज नाशिकमध्ये होते. आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. दादासाहेब गायकवाड यांचं देशातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठं आहे. नाशिकसाठीच्या विकासात तर त्यांचं योगदान अनन्यसाधारण राहिलं आहे. त्यामुळेच नाशिकच्या विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असं आठवले म्हणाले.
यावेळी आठवले यांनी तिसरी लाट येणार नसल्याचं स्पष्ट केलं. तिसरी लाट येणार नाही. पण काळजी घ्या. फक्त सरकारला याचा सामना करता येणार नाही, असं सांगतानाच कोरोना काळात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधील काही पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यांनाही 50 लाखाचा विमा मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला नाही. बाकी राज्यातही 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय राज्याने घ्यावा. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. जातीय व्यवस्था आहे तर आरक्षण असलं पाहिजे. मोदी सरकारचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. संपूर्ण देशात क्षेत्रीयांना 10 ते 12 टक्के आरक्षण द्यावं ही मागणी पंतप्रधान यांच्याकडे केली आहे. मी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी आज झालेल्या मराठा आंदोलनावरही भाष्य केलं. या मोर्चाला अशोक चव्हाण गेले नसतील तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. म्हणून काय त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असं होतं नाही. मराठा समाजात गरीब लोक आहेत. ज्यांचं उत्पन्न कमी आहे. त्यांना आरक्षण द्यायला हवं. आमचं फडणवीस सरकार असतं तर आम्ही कोर्टात चांगली बाजू मांडली असती. पण या सरकारला कोर्टात बाजू मांडता आली नाही, अशी टीका त्यांनी केली.
(फोटो गुगल)