आयकर विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर चोरी उघड आणली आहे. हैदराबाद मधील दोन रियल इस्टेट डेव्हलपर्स वर धाड टाकण्यात आली त्यात जवळपास 700 कोटींची कर चोरी समोर आली आहे. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे.
कारवाई करण्यात आलेले दोन्ही ग्रुप भूखंड व्यवहार तसंच बांधकाम क्षेत्रात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, “कारवाईदरम्यान नियमांचं उल्लंघन करणारी अनेक कागदपत्रं, हस्तलिखित पुस्तके, करारनामे ज्यामधून बेनामी व्यवहार झाल्याचं दिसत आहे ती जप्त करण्यात आली आहे. याशिवाय विशेष सॉफ्टवेअर अँपमधील आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधील सर्व डाटाही मिळवण्यात आला आहे”.
या ग्रुप्सकडून नोंद करण्यात आलेल्यापेक्षा जास्त रक्कम घेतली जात होती आणि ही बेनामी रक्कम जमिनींच्या व्यवहारासाठी तसंच इतर व्यवसायिक खर्चांसाठी वापरली जात होती. कारवाईदरम्यान अनेक पुरावे हाती लागले आहेत ज्यामधून ७०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता समोर येत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.