सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचं भारतीय सिनेरसिकांच्या मनावर गारुड आहे. दक्षिण भारतीय सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताहेत. बॉक्स ऑफिसवर गल्ला करण्याबरोबरच हे सिनेमे सिनेरसिकांच्या मनात घर करत आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या नुकताच रिलीज झालेला आणि मोठ्या स्क्रीनवर दिमाखात मिरवणारा सिनेमा पुष्पा.
पुष्पाने चाहत्यांच्या मनात घर करण्याचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड मोडलेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण हा सिनेमा फक्त दक्षिणेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर देशभर या सिनेमाची चर्चा आहे. आणि सिनेमानं अभिनेता अल्लू अर्जुनला ‘द अल्लू अर्जुन’ बनवलं.
पुष्पा हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला. आणि तेव्हापासून आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केलाय. या सिनेमासोबतच 83 हा बॉलीवूडचा एक मोठा सिनेमादेखील प्रदर्शित झाला होता. भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपची ती गोष्ट होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसारखी मोठी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमालाही मागे टाकत पुष्पाने आपल्या विजयाचा झेंडा रोवला. यातलं अल्लू अर्जूनने साकारलेलं ‘पुष्पा’ हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं. त्याची स्टाईल. त्याचे डायलॉग सगळंच लोकांच्या मनाला भावलं आणि अल्लू अर्जुन फक्त दक्षिणेचा हिरो नाही तर तो देशाचा सुपरस्टार बनला.
‘पुष्पा’ हा सिनेमा लाल चंदनाच्या तस्करीवर बेतलेला आहे. या चित्रपटाची कथा लाल चंदन, त्याची तस्करी आणि पुष्पाची हुशारी यावर आधारित आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेलं लाल चंदन फक्त आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा, चित्तूर आणि नेल्लोर जिल्ह्यामध्ये सापडतं. पण या चंदनाला परदेशात मोठ्या प्रामाणावर मागणी असल्याने त्याची तस्करी केली जाते. याभोवतीच हा सिनेमा फिरतो.
एका सर्वसामान्य कामगारापासून ते त्या भागातला मोठा तस्कर होण्यापर्यंतचा पुष्पाचा प्रवास विशेष आहे. त्यासाठी त्याला येणाऱ्या अडचणी, सोसाव्या लागलेल्या गोष्टी यामुळे पुष्पाची भूमिका महत्वाची ठरते. त्याचं एका सामान्य मुलीवर जडलेलं प्रेम या सिनेमाला अधिक रंजक करतो.
‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है मैं…’ या डायलॉगने तर अख्खा सोशल मीडिया व्यापलाय. या डायलॉगवर सध्या रील्स बनवले जाताहेत. ते रील्स ट्रेंडिंग आहेत. ‘पुष्पा… पुष्पराज… मैं झुकेगा नही साला…’ हा डायलॉग तर तरूणाईच्या मनामनात आहे. थोडक्यात काय तर सिनेमाचे चांगलेच डायलॉग भाव खाताहेत.