स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारनं सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी बोस यांची जयंती यावर्षीपासून पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे. आज संसदेत सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा तिथं असेल. नरेंद्र मोदी आज त्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. होलोग्राफिक हे डिजीटल तंत्र आहे. हे प्रोजेक्टर सारखं काम करतं. यामध्ये कोणतिही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते. आपण समोर पाहत असलेली गोष्ट खरी असल्याचा भास होतो पण आपण थ्री़डी इमेज पाहत असतोॉ.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा राजा पंजम जॉर्ज याचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीमध्ये बसवला जाणार आहे. 1968 मध्ये पंचम जॉर्ज यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळीपासून ती मेघडंबरी रिकामी होती.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दूंगा अशी घोषणा केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे व्यक्ती म्हणून त्यांचं योगदान आहे. 23 जानेवारी 1897 रोजी नेताजींचा जन्म ओडिशाच्या कटकमध्ये झाला होता. सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग स्वीकारला. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचं काम सुभाषचंद्र बोस यांनी केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय काँग्रेसचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं.