चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र

चलनी नोटांतून कोरोना विषाणूंच्या (COVID VIRUS) प्रसाराची शक्यता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारला याविषयीचे स्पष्टीकरण मागविले आहे. केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका न घेतल्याबद्दल कॅटने खेद व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया आणि आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांच्याकडे चलनी नोटांतून (currency note) होणाऱ्या विषाणूंच्या प्रसाराविषयी मत मागितले आहे. कोट्यावधी लोकांचा चलनी नोटांशी संपर्क येतो. त्यामुळे चलनी नोटांवर विषाणुविषयी केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार किंवा आरबीआयने अद्याप अधिकृत खुलासा केला नसल्याने संघटनेने आश्चर्च व्यक्त केले आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

कोविड विषाणूचा चलनी नोटेद्वारे होणाऱ्या प्रसाराविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. कोविड विषाणू प्रसाराचे अनेक माध्यमे आहेत. त्यापैकी चलनी नोटा देखील माध्यम ठरू शकते. लाखो व्यापारी चलनी नोटांच्या संपर्कात असतात. चलनी नोटांतून विषाणू प्रसार होत असल्याचे सिद्ध झाल्यास लाखो व्यापारी आणि ग्राहकांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. सर्वप्रथम 2 सप्टेंबर, 2018 रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सर्वप्रथम स्पष्टीकरण मागविले. त्यानंतर वर्ष 2019 , वर्ष 2020 आणि वर्ष 2021 मध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरला अनेकवेळा स्मरणपत्रे पाठविली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही. त्यामुळे महत्वपूर्ण मुद्द्यावर मौन का असा सवाल कॅटच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात चलनी नोटांतून होणाऱ्या विषाणू प्रसाराचा दावा केला आहे. त्यासाठी देशात तसेच जागतिक स्तरावरील विविध संशोधनांचे संदर्भ दिले आहेत. केवळ कोविड नव्हे तर अन्य रोगांना कारण ठरणाऱ्या विषाणूंचा प्रसार नोटांमार्फत घडत असल्याचा दावा कॅटने केला आहे.

जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाईड सायन्सेस, इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मा अँड बायो सायन्स, इंटरनॅशनल जर्नल ऑफ अडवॉन्स्ड रिसर्चच्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. ग्राहकांदरम्यान चलनी नोटांच्या हस्तांतरणावेळी विषाणूंचे संक्रमण होत असल्याचे वरील निष्कर्षातून सिद्ध झाल्याचा दावा कॅटने पत्राद्वारे केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.