आर्थिक वृद्धी दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज

चालू वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा उत्तम असेल, असा अंदाज भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलन धोरण समितीच्या सदस्य आशिमा गोयल यांनी म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. मात्र आता हळूहळू देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पामध्ये जे कमजोर क्षेत्र आहेत, त्यांच्यासाठी भरीव तरतुद केल्यास अर्थव्यवस्था सुधारण्यास अधिक चालना मिळेल असेही त्यांनी यावेळी म्हटले.

गोयल पुढे बोलताना म्हणाल्या की, कोरोना काळात केंद्र सरकारने काही चांगले निर्णय घेतले. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. डबघाईला आलेल्या उद्योगांना बळ मिळाले. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत जीडीपी 9.5 ते 10 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तसेच महागाई देखील सध्या नियंत्रीत पातळीवर असून, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. भारताकडे विदेशी गंगाजळी देखील बऱ्यापैकी आहे. मात्र ती आणखी वाढवता येऊ शकते. या सर्वांचा सकारात्मक परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होताना दिसत असून, येत्या काही महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा 9.5 टक्के राहू शकतो असा अंदाज आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र त्याच्या पुढील वर्षी आर्थिक वृद्ध दरात काही प्रमाणत घसरण होण्याचे संकेत देखील मध्यवर्ती बँकेकडून देण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2022 -23 मध्ये आर्थिक वृद्धीदर हा 8.5 टक्क्यांच्या आसपास राहणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. त्याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनंतर उद्योगधंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले असून, रोजगारात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.