नाशिक महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते सातवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र असताना राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जात आहे. ओमिक्रॉन विषाणू आढळून आल्यानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा कल आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे.
नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शाळा चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं या संस्थाचालकांनी म्हटलंय.