खबरदारी घेतली नाही, तर तिसऱ्या
लाटेचा मोठा फटका बसू शकतो
आयएमएनं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ओमायक्रॉनसंदर्भात भूमिका स्पष्ट केल्याचं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. “आत्ता कुठे भारतात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, त्यात ओमायक्रॉन आल्यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. जर आपण योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर आपल्याला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो”, असं आयएमएनं स्पष्ट केलं आहे.
फेब्रुवारी महिन्यात
तिसरी लाट उच्चांक गाठू शकते
करोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. लवकरच या व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते, असा इशारा आयआयटीमधल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. करोना विषाणूसंदर्भातला अभ्यास करणारे आयआयटीमधले शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तवला आहे. मात्र ओमायक्रॉनमुळे येणारी ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
शेअर बाजारची ११०० हून
अधिक अंकांची उसळी
सोमवारी घसरणीसह बंद झालेल्या शेअर बाजाराने मंगळवारी व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा उसळी घेतली आहे. दुपारच्या व्यवहारापर्यंत, सेन्सेक्स ११०० हून अधिक अंकांनी मजबूत झाला आणि ५७,८०० अंकाच्या पार केला. दुसरीकडे, निफ्टी ३०० अंकांनी मजबूत होऊन पुन्हा एकदा १७,२०० अंकांच्या पुढे गेली आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक १.५ टक्क्यांहून अधिक घसरून तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आले होते. मात्र, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
महापालिका हद्दीतील इमारतींची
उंची कमी होण्याची शक्यता
राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील इमारतींची उंची कमी होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून नवा नियम लागू होणार आहे. 36 मीटर उंचीची मर्यादा कमी होऊन 24 मीटरपर्यंत केली जाणार आहे. पुर्नविकासात अडचणी येण्याची शक्यता आहे. सदनिकांच्या किंमतीही वाढणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये बांधकाम नियमावलीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने ‘यूडीपीसीआर’ नियमावली लागू केली. 36 मीटर उंचीपर्यंतच्या इमारती उभारण्यास परवानगी दिली. आता यात बदल होऊन 24 मीटर उंची असणार आहे.
श्री कृष्ण जन्मभूमीवरील ‘सफेद
भवन’ हिंदूंच्या ताब्यात द्यावे
मुस्लिम समुदायाने पुढे येऊन मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीवरील ‘सफेद भवन’ हिंदूंच्या ताब्यात द्यावी, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी केलंय. न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचे निराकरण केले असताना, काशी (वाराणसी) आणि मथुरा येथील पांढऱ्या इमारती हिंदूंना दुखावतात. दोन ठिकाणच्या मुस्लिम धार्मिक संरचनांचा संदर्भ देत शुक्ला यांनी हे विधान केलंय. एक वेळ येईल जेव्हा मथुरेतील प्रत्येक हिंदूला दुखावणाऱ्या पांढऱ्या इमारती न्यायालयाच्या मदतीने हटवल्या जाईल.
सरकार बद्दल चांगले लिहिले तरच
जाहिराती मिळतील : ममता बॅनर्जी
माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सरकारच्या चुका दाखवण्याची महत्त्वाची जबाबदारी या स्तंभावर असते, असं मानलं जातं. माध्यमांचं हेच स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि जाहिरातदारांच्या प्रभावाखाली ते गमावलं जाऊ नये, यासाठी सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिराती दैनिकांमध्ये छापल्या जातात, जेणेकरून त्यांना उत्पन्न मिळत राहावं आणि त्यांना जाहिरातदारांवर अवलंबून राहावं लागू नये. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या याच जाहिरातींसाठी सरकारबद्दल चांगलं आणि सकारात्मक लिहिण्याची अटच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकाराला घातली आहे. भर कार्यक्रमात ममता बॅनर्जी आणि या पत्रकारामधल्या संवादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा
विवाह रजिस्टर पद्धतीने
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
कसोटी मालिकेसाठी दक्षिण
आफ्रिकेचा संघ जाहीर
भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) २१ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल. बायो बबलमुळे एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडूंचा बोर्डाकडून संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) भाग आहे. या मालिकेतील सामने सेंच्युरियन, वाँडरर्स आणि न्यूलँड्स येथे खेळवले जातील. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
SD social media
9850 60 3590