गुजरात मध्ये अल्पवयीन मुलीला समाजाने दिली अशी वागणूक

प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील हरिज गावात घडली आहे. गावकऱ्यांनी प्रथम मुलीच्या चेहऱ्याला काळं फासलं, त्यानंतर तिचं मुंडण केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. यानंतर तिच्या डोक्यावर अग्नीकांडाने भरलेले मडके ठेवून तिला गावभर फिरवण्यात आलं. पीडित 14 वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप आहे. ही घटना गेल्या मंगळवारी (9 नोव्हेंबर) घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक (पाटण) अक्षयराज मकवाना यांनी सांगितले की, वाडी जमातीच्या लोकांनी मुलीला तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची शिक्षा दिली आणि तिचे मुंडण केले. तिच्या चेहऱ्याला काळं फासले. यानंतर डोक्यावर आग असलेले भांडे ठेवून तिला गावभर फिरवले. वाडी जमातीच्या लोकांचा असा दावा आहे की मुलीने आपल्या कृत्याने आपल्या जमातीची बदनामी केली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोक तिला ‘शुद्ध’ करण्यासाठीचा विधी म्हणून तिचे मुंडण आणि चेहरा काळा करताना दिसत आहेत. मुलगी रडताना दिसत आहे. गावकऱ्यांनीही शिक्षा म्हणून मुलगी आणि तिच्या प्रियकराला गावभर फिरवलं. यानंतर मुलीच्या घरच्यांनी स्वतः तिचा साखरपुडा त्यांच्या जमातीतील एका मुलाशी केला.

एसपी म्हणाले की, ज्या मुलासोबत मुलगी पळून गेली होती त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर मुलीचे अपहरण करून तिला खेडा जिल्ह्यातील डाकोर येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपींवर आयपीसी, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याची संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.