टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला लोवळवलं आणि फायनलमध्ये जागा पक्की केली. न्यूझीलंडच्या विजयाची चर्चा सुरु असतानाच दुसऱ्या सेमी फायनलबाबतही मोठं वृत्त आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असतील. वर्ल्ड कपवर डोळा ठेवून असलेल्या पाकिस्तानसाठी मात्र चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण त्यांचे फार्मातले दोन बॅटसमन फ्लूनं आजारी आहेत. हे दोन बॅटसमन आहेत शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान. फ्लूमुळे शोएब आणि रिजवान दोघांनीही प्रॅक्टिसमध्येही भाग घेतला नाही. चांगल्या फार्मात असलेल्या दोन्ही फलंदाज फ्लूनं बेजार झाल्यामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगतं की काय अशी चर्चा आता सुरु झालीय.
पाकिस्तानी माध्यमांनुसार-सरफराज अहमद आणि हैदर अलीला रिप्लेसमेंट म्हणून तयार ठेवण्यात आलंय. दोघेही जण सध्याच्याच स्क्वॉडचाच भाग आहेत. दरम्यान शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान दोघांचीही कोरोना टेस्ट करण्यात आलीय आणि तिचे रिपोर्ट नेगेटीव्ह आहेत. पण डॉक्टरांनी सध्या तरी दोघांनाही आराम करण्याचा सल्ला दिलाय. सेमी फायनलच्या आधीच दोघांबाबतही मोठा निर्णय होऊ शकतो.
मॅच सेमी फायनलचा आहे आणि समोर ऑस्ट्रेलियासारखी मजबूत टीम आहे. त्यांना मात द्यायची असेल तर फार्मात असलेले बॅटसमन खेळणं गरजेचं आहे. शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान दोघेही सध्या खोऱ्यानं रन्स काढतायत. शोएब मलिकनं तर शेवटच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 54 रन्स ठोकल्यात. यावरुनच सध्या तो पाकिस्तान टीमसाठी किती महत्वाचा आहे याचा अंदाज येईल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये शोएब मलिकनं- 26, 19, 54 अशा रन्स केल्यात. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद रिजवान- 79, 33, 08, 79, 15 अशा रन्स केल्यात. त्यात रिजवाननं भारताविरोधात केलेली खेळी कशी विसरता येईल.