नागपूर शहरात एक डिसेंबरपासून कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. महानगरपालीकेच्या लसीकरण केंद्रात पहिल्या डोसची मोफत सेवा बंद होणार आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिलीये. शहरातील अद्याप 14 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला नसल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आले आहे. मात्र काही लोकांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. ते लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे पालिकेच्या निर्दशनास आल्याने, एक डिसेंबरपासून पहिला डोस हा मोफत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला डोस घेण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागू शकतात, असे वाटून तरी नागरिक नोव्हेंबरच्या आत आपला पहिला डोस पूर्ण करतील अशी अपेक्षा असल्याचे जोशी म्हणाले.
शहरातील झोपडपट्टी परिसर आणि काही समुदायांमध्ये लसीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यामुळेच अशा भागात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. यामध्ये नागपूरातील आसीनगर झोन, सतरंजीपुरा, गांधीबाग, लकडगंज अशा परिसराचा समावेश होतो. 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस पूर्ण करावा असे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना आखल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून एक डिसेंबरपासून पहिल्या डोससाठी मोफत लसीकरण बंद करण्यात येणार आहे. मात्र दुसरा डोस हा मोफतच देण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
नागपुरात 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 19 लाख 83 हजार असून, आतापर्यंत 16 लाख 87 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र अद्यापही 2 लाख 70 हजार नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोनही डोस घेतले आहेत, फक्त त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.