अमेरिकेत लवकरच दिवाळीची सार्वजनिक सुट्टी घोषित होणार आहे. न्यूयॉर्कमधील काँग्रेसवुमन कॅरोलिन बी मॅलोनी यांनी जाहीर केले की, दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आहे. मॅलोनी कॅपिटॉल येथे एका कार्यक्रमात म्हणाल्या की, “मला आनंद होत आहे की दिवाळीला एक फेडरल (सार्वजनिक) सुट्टी म्हणून कायद्यात समाविष्ट होईल.” या ऐतिहासिक कायद्याला भारतीय-अमेरिकन काँग्रेसच्या राजा कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक खासदारांनी स्वागत केले आहे.
फॉरेन अफेअर्स हाऊस कमिटीचे अध्यक्ष, सिनीयर काँग्रेसमॅन ग्रेगरी मीक्स यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. “फॉरेन अफेअर्स कमिटी याला पाठिंबा देईल आणि या विधेयकाचा पाठपुरवठा केला जाईल,” असे ते म्हणाले.
कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगत एक ठरावही मांडला आहे. कृष्णमूर्ती म्हणाले, दिवाळीची ही फक्त एक फेडरल (सार्वजनिक) सुट्टी नसून भारतीय-अमेरिकन जनतेचे संबंध साजरी करणारे पाऊल ठरेल. “आमेरिकेतील आणि जगभरातील शीख, जैन आणि हिंदूंसाठी दिवाळी हा कृतज्ञतेचा काळ आहे तसेच अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव आहे,” असे कृष्णमूर्ती यांनी ठराव मांडल्यानंतर सांगितले.”दिवाळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखण्यासाठी हा द्विपक्षीय ठराव मांडताना मला अभिमान वाटतो,” कृष्णमूर्ती म्हणाले.