जो सोने को देते है आकार, नाम है उनका स्वर्णकार… अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोलेबाजी केली. तसेच स्वर्णकार समाजाला केंद्र सरकारद्वारे न्याय मिळवून देणार असल्याचंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.
विशाखापट्टणम येथे आंध्र प्रदेश स्वर्णकार समाजातर्फे रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आठवले बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून स्वर्णकारांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रक्कमेच्या प्रातिनिधिक धनादेशाचे प्रतिकात्मक वाटप इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया तर्फे आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओबीसी आयोगाचे सदस्य आचारी तल्लुजू, कार्यक्रमाचे आयोजक करी वेणू माधव, रिपाइं आंध्र प्रदेश अध्यक्ष ब्रह्मा नंद रेड्डी, शिवा नागेश्वर राव, बी अनिलकुमार इंडियन बँक मॅनेजर व्यंकटराव, नगरसेविका विजय लक्ष्मी, नगरसेवक गौड नरसिम्हा आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वर्णकार समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी करी वेणू माधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी आंध्र प्रदेशातील स्वर्णकार समाज मोठया संख्येने उपस्थित होता. विशाखापट्टणम येथे महाराष्ट्रातील सातारा, सांगली मधील खानापूर, आटपाडी येथील स्वर्णकार कामगार वास्तव्यास आहेत. त्यांची ही यावेळी उपस्थिती होती.
जो सोने को देते है आकार, नाम है उनका स्वर्णकार… अशी काव्यमय सुरुवात करून ओबीसीमध्ये येणाऱ्या स्वर्णकार समाजाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, स्वर्णकार समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सर्वांना साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास ही मोदी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
बीआयएसद्वारे हॉल मार्कचा परवाना स्वर्णकार कारागिरांना देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात बीआयएस तर्फे स्वर्णकारांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, आदी स्वर्णकार समाजाच्या मागण्या असून त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा कर्ज योजना सुरू केल्याने स्वर्णकार समाजातील कारागिरांना लाभ झाला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आठवले यांचे आभार मानण्यात आले.