केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रहारमध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत, असं सांगतानाच आम्हीही राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस शहा यांची भेट ही पक्षांतर्गत चर्चेसाठी असेल. पक्षांतर्गत गाठीभेटीवर मला काही बोलायचं नाही. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी तपास यंत्रणांनाही कानपिचक्या दिल्या. तपास यंत्रणांनी आपलं काम करावं. पण काम करत असताना दबावाखाली करू नये. तपास करताना प्रसिद्धीचा स्टंट केला जातो. तपास यंत्रणांनी घाबरवण्याचे काम करू नये हे नरेंद्र मोदींच मत योग्यच आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच हिंदुत्व आणि मनसे, भाजपचे हिंदुत्व यात जमीन अस्मानचा फरक आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर हे शिवसेनेचं वेगळं नातं आहे, असंही त्यांनी सांगितलं.