म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या हिंसाचारात 30 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सॅगिंग परिसरात घडली. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण म्यानमारमध्ये सैन्याविरोधात नागरिकांनी हत्यारं उचलली आहेत, आणि त्यामुळे म्यानमारमध्ये गृहयुद्धाची शक्यता वाढली आहे. रेडिओ फ्री एशियाच्या माहितीनुसार, जंता सैन्याने या परिसरात हिंसाचार केला, अनेकांना घरात घुसून मारलं, त्यानंतर पीपल्स डिफेन्स फोर्स (PDF) च्या सैनिकांनी याविरोधात हल्ला केला. ज्यामध्ये 30 जंता सैनिक ठार झाल्याची माहिती आहे.
पीडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, रणनीतिक कमांडरसह किमान 30 सैनिक मारले गेले आहेत. लष्करी ताफा पाले परिसरात लँडमाइनचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी घडली. प्रवक्त्याकडून सांगण्यात आले की, हा ताफा रविवारपासून वाट पाहत होता. कारण वरिष्ठ कमांडरही त्यांच्यासोबत जाणार होते. 1 फेब्रुवारी रोजी म्यानमारमध्ये बंडखोरी झाली आणि तेव्हापासून देशात अशांततेचे वातावरण आहे. म्यानमार लष्कराचे वरिष्ठ जनरल मिंग आंग हिलिंग यांनी सरकार उलथवून टाकले आणि देशात एक वर्षाची आणीबाणी घोषित केली. सत्तांतर झाल्यापासून देशात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनं चालू आहेत, ज्यात हिंसाचार होत आहे.
अलीकडेच संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनीही म्यानमारमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मानवाधिकार आयोगाकडून लष्करी जंता सैन्याची तैनाती आणि म्यानमारची नागरी लोकसंख्या असलेल्या अनेक भागात किंवा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे गोळा करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे की, दोन उच्चपदस्थ कमांडरांच्या तैनातीमुळे चिंता वाढली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्या रवीना शामदासानी यांनी जिनिव्हामध्ये पत्रकारांना सांगितले की, सध्याची म्यानमारची परिस्थिती चिंताजनक आहे, म्यानमारच्या लष्कराने गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठ मोठी शस्त्रे आणि सैन्य तैनात केले आहे. त्या म्हणाल्या की, लष्कर चीन राज्यातील कानपेटलेट आणि हखा टाउनशिप, मध्य सागिंग प्रदेशातील कानी आणि मोनिवा टाउनशिप आणि मॅगवे प्रदेशातील गांगो टाउनशिपमध्ये तैनात करण्यात आले आहे. प्रवक्त्यांनी सांगितले की, या भागातील इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे.