कर गोळा करता मग राज्यांना त्यांचा वाटा का देत नाही? : शरद पवार

ईडीच्या कारवाया आणि लखीमपूर हिंसेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यांकडून कर गोळा करता मग राज्यांना त्यांचा वाटा का देत नाही? असा रोखठोक सवाल शरद पवार यांनी केला आहे. पवार यांनी पहिल्यांदाच केंद्र सरकारला कर वसुलीवरून सवाल केल्याने पवारांनी केंद्राविरोधात दंड थोपटल्याची चर्चा आहे.

शरद पवार आज सोलापुरात आहेत. सोलापुरात ते राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना पवारांनी थेट केंद्र सरकारला हिशोबच विचारला आहे. दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात आहे. केंद्र सरकार इकडून कर गोळा करते. मात्र राज्याला त्याचा वाटा देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असं करत आहेत. अतिवृष्टीचे पैसेही केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टीचे पैसे देताही आज देऊ, उद्या देऊ करत आहेत, असं पवार म्हणाले.

मी मंत्री असताना गुजरातला निधी देऊ नका असं मला सांगितलं जात होतं. पण मी मात्र देश चालवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे संकुचितपणा न ठेवता मदत केली. मी गुजरातमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आहे हे पाहिले नाही. तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात महाराष्ट्र कुठे आहे असं लोक विचारतात. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची बैठक झाली. त्यात 11 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी व्हा. एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये. कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असं ते म्हणाले.

यावेळी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. तरीही इकडे किंमती रोज वाढताना दिसत आहेत. या महागाईला भाजप सरकार जबाबदार आहे. त्यामुळे 11 तारखेचा बंद महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्हा हा अन्यायाविरोधात लढणारा आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

लखीमपूर येथे झालेल्या हिंसेवरही त्यांनी पुन्हा भाष्य केलं. मी लखीमपूर हिंसेचा जालियनवाला बागेशी संबंध जोडला. हा उल्लेख सत्ताधाऱ्यांना रुजला नाही. एका सत्ताधारी नेत्याने मला सांगितलं. त्यामुळे छापेमारी करण्यात आली. पण तुम्ही छापा मारा, काही करा. पण मी सामाजिक बांधिलकी सोडणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.